… तर पंढरीत पाऊल ठेऊ देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आषाढी एकादशीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत ठोस भूमिका जाहीर करावी अन्यथा श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंढरीत पाय ठेवू देणार नाही असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मराठा समाजातील विविध पक्षाचे नेते, सामाजिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांची पंढरपूर मध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाचा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजाने सनदशील मार्गाने मोर्चेसह नानाविध प्रकारची आंदोलने केली पण एकही मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली नाही. केवळ आश्वासनाची बोळवण केली म्हणून मुख्यमंत्र्यांना श्री. विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला आहे.

येत्या २३ जुलैला आषाढी एकादशी आहे. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते संपन्न होत असते. या वर्षी मुख्यमंत्र्यांना महापूजा करायची असेल तर २३ जुलै पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करावा. मागण्यांबाबत विचार न करता मुख्यमंत्री महापूजेला येणार असतील तर त्यांना महापूजेपासून रोखले जाईल.शासनाने बळाचा वापर करुन आंदोलन मोडण्याचा प्रयन्त केल्यास गनिमिकाव्याने मुख्यमंत्र्यांना रोखले जाईल, प्रसंगी रक्तपात झाला तरी मागे हटणार नाही अशी भूमिका गायकवाड यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी माजी नगरसेवक, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे, मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत चव्हाण, अंकुश मुंगूसकर उपस्थित होते.