कुचकामी रामदेवबाबांचाही सरकारवर अविश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

बेरोजगारी दूर करण्याच्या निव्वळ बाता मारणाऱया केंद्रातील भाजप सरकारवर देशभरातून टीका होत असताना आता त्यात योगगुरू रामदेव बाबाही सामील झाले आहेत. बेरोजगारी ही देशातील प्रमुख समस्या असून ती दूर करण्यात केंद्र सरकार कुचकामी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. भाजप गोटातील समजल्या जाणाऱया रामदेवबाबांनीही केंद्रातील सरकारला कुचकामी ठरवल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.

बेरोजगारी, गरिबी आणि भूक हे भारतमातेच्या कपाळावर लागलेले डाग असून आपण ते पुसले पाहिजेत, मात्र केंद्र आणि राज्य सरकार त्यात कुचकामी ठरले आहे असे रामदेव बाबा यांनी मध्य प्रदेशच्या भोपाळ येथे बोलताना सांगितले. हिंदूंविरुद्ध वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपवाल्यांनी स्वामी अग्निवेश यांना मारहाण केली. याबाबत बोलताना रामदेव बाबा यांनी हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला आपले मत मांडण्याचा मूलभूत अधिकार असून अग्निवेश यांच्यावर त्यासाठी हल्ला करणे हे निषेधार्हच आहे असे सांगितले.