
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान पदावर आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी चार वर्षांमध्ये परदेश दौऱ्यांचे अर्धशतक पूर्ण केले असून त्यासाठी तब्बल दीड हजार कोटी खर्च झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आजवरच्या पंतप्रधानांमध्ये ते सर्वात खर्चिक पंतप्रधान ठरले आहेत.
पंतप्रधानांनी आतापर्यंत चार वर्षांत ५४ देशांचा दौरा केला आहे. या दौऱ्यावर एकूण १,४८४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या चार वर्षांत १७१ दिवस परदेशात राहिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान म्हणून सुमारे १२ टक्के वेळ त्यांनी परदेशात घालवला आहे. विशेष म्हणजे ९ वर्षं पंतप्रधान पदावर असणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या कार्यकाळात परदेश दौऱ्यांवर ६४२ कोटींचा खर्च केल्याचं समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्याहून अर्धा काळ पंतप्रधान पदावर राहणाऱ्या मोदींनी मात्र सिंग यांच्यापेक्षा अधिक खर्च केल्याचं स्पष्ट झालं आहे.
एप्रिल २००५ मध्ये मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाला गेले होते. त्यांचा हा दौरा आजवरचा सर्वात महागडा दौरा ठरला आहे. या दौऱ्यातील त्यांच्या केवळ चार्टर्ड फ्लाइट आणि हॉटलाइन सुविधेवर ३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. पंतप्रधान म्हणून मोदींनी अमेरिकेचा दौरा सर्वाधिक वेळा केला आहे. जुलै ते नोव्हेंबर या काळात त्यांनी सर्वाधिक परदेशवारी केली आहे.
























































