
हवामान खात्याने चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची खूशखबर दिली आहे. पुढील दोन-चार दिवसांत मराठवाडा, घाटमाथ्यासह कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी आतापर्यंत तरी आपल्या वेधशाळेचे ‘अंदाजपंचे’ झालेले नाही. यापुढेही ते होऊ नये आणि ‘पीक’ बरे; पण पाण्याचे काय, हा प्रश्न महाराष्ट्राला पडू नये एवढीच अपेक्षा!
मागील आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण आणि नाशिक जिल्ह्यांत पावसाने दमदार बॅटिंग करून आपले ‘कर्तव्य’ चोख पार पाडले आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातपैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या तलावांमधून दररोज ३९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी दीडशे दशलक्ष पाणी ठाणे आणि भिवंडीला दिले जाते. या सातपैकी चार धरणांत आता १० लाख ३४ हजार ५७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीही हे तलाव २४ जुलैच्या आसपास भरले होते. यंदा ते १८-१९ जुलैलाच ओव्हरफ्लो झाले. भातसा धरण सध्या ७८ टक्के भरले असले तरी त्याच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पाऊस मुसळधार नसला तरी पुन्हा सक्रिय झाला आहे. जिल्ह्याच्या सरासरीच्या ७८-८२ टक्के पावसाची नोंद आताच झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिका क्षेत्रांना पाणीपुरवठा करणारे बारवी धरणही भरले आहे. त्यामुळे या भागालाही पुढील वर्षभरासाठी दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे
महिनाभरातील कसर
बर्यापैकी भरून निघाली आहे. भंडारदरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तिकडे खडकवासला धरण साखळीत ८१.७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला तर १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. पानशेतमध्ये ९७ टक्के तर पिंपरी-चिंचवडची पाण्याची गरज भागविणार्या पवना धरणाची पाणीपातळी ९० टक्के एवढी झाली आहे. कोयना धरणाचेदेखील सहा दरवाजे तीन दिवसांपूर्वी उघडण्यात आले होते. ८-१० दिवसांपूर्वी मुंबईसह महाराष्ट्राच्या बर्याच भागांत जो पाऊस झाला त्याचा परिणाम म्हणून ही ‘धरणपूर्ती’ होताना दिसत आहे. अर्थात एकीकडे हे चांगले चित्र असले तरी दुसरीकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग आजही धरणांची पाणीपातळी वाढेल अशा धुवाधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तेथे पाऊस नाही असे नाही, पण तो रिपरिप स्वरूपाचा आहे. या पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांवरील दुबार पेरणीचे संकट बर्यापैकी टळले असले तरी शेवटी प्रश्न नद्या, नाले भरून कधी वाहतील आणि धरणे कधी भरतील याचा आहे. त्यासाठी जशी पर्जन्यवृष्टी हवी तशी अद्याप मराठवाड्यासह काही भागांत झालेली नाही. त्यामुळे ‘पीक चांगले, पण पाणी तितकेसे बरे नाही’, अशी काहीशी
तेथील अवस्था
आहे. नद्या-नाले भरून वाहतात तेव्हा भूजलस्तरदेखील वाढतो आणि छोटी-मोठी धरणे, बंधारे यांच्या पाणीपातळीतही वाढ होते. हेच पाणी नंतर पिण्याचा प्रश्न सोडवते. मराठवाड्यासाठी तर ही विचित्र परिस्थिती नेहमीचीच आहे. अनेक वर्षांनंतर गेल्या वर्षी जायकवाडी धरण प्रथमच शंभर टक्के भरले होते. यंदा त्यातील साठा जुलै संपत आला तरी २७ टक्केच आहे. कारण त्याच्या पाणलोट क्षेत्रात तसा धुवाधार पाऊस झालेला नाही. इतर धरणांचीही स्थिती खूप चांगली नाही. मराठवाड्यातील शेतकर्यांवर दुबार-तिबार पेरणीची वेळ वरुणराजाने तूर्त आणली नसली तरी ‘पाण्या’चे काय होणार, हा प्रश्न आहेच. अर्थात पावसाळ्याला आता खर्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. हवामान खात्याने चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची खूशखबर दिली आहे. पुढील दोन-चार दिवसांत मराठवाडा, घाटमाथ्यासह कोकणात मुसळधार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या वर्षी आतापर्यंत तरी आपल्या वेधशाळेचे ‘अंदाजपंचे’ झालेले नाही. यापुढेही ते होऊ नये आणि ‘पीक’ बरे; पण पाण्याचे काय, हा प्रश्न महाराष्ट्राला पडू नये एवढीच अपेक्षा!





























































