दरवाजा बाहेर उभे राहू नका, पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबडय़ा तपासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वजन वाढावे म्हणून पोल्ट्री फार्म व्यावसायिक कोंबडय़ांना अॅण्टीबायोटिक्स औषधे देत असून फुगलेले चिकन खाल्ल्यामुळे त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. या चिकनचा दर्जा तपासण्यासाठी सरकारकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने हायकेर्टाने नाराजी व्यक्त केली. तक्रार आल्यास केवळ पोल्ट्री फार्मच्या दरवाजाबाहेर उभे राहू नका तर पोल्ट्रीत जाऊन कोंबडय़ा तपासा अशा शब्दांत हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले.

पोल्ट्री फार्ममधील कोंबडय़ांबाबत ‘सिटीझन सर्कल फॉर सोशियल वेल्फेअर अॅण्ड एज्युकेशन’ या संस्थेने अॅड. शेहजाद नक्वी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी आज सुनावणी घेण्यात आली. शासकीय परवानगी न घेताच अनेकजण पोल्ट्री फार्म बांधतात. त्याबाबत हायकोर्टाने सरकारला विचारणा केली परंतु सरकारला त्याबाबत माहिती देता आली नाही.

डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय…

डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनची आवश्यकता असतानाही बाजारात सर्रासपणे कोंबडय़ांसाठी लागणारी अॅण्टीबायोटिक औषधे विकली जात असल्याचे अॅड. नक्वी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावरून शासनाला हायकोर्टाने खडसावत डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय यापुढे अशा औषधांची विक्री केली जाऊ नये यासाठी खबरदारी घ्या असे आदेश दिले.