मराठा आरक्षण आंदोलनाचे पुणे महापालिकेत पडसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद  पालिकेच्या सभागृहात उमटले. सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेले काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची तहकुबी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मांडली. त्यामुळे कोंडी झालेल्या भाजपने ही तहकुबी स्वीकारली. विरोधीपक्षांनी सभा तहकुबीवर बोलण्याची मागणी केल्यानंतर  सत्ताधारी भाजपने सभा गुंडाळली. त्यावर  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘भाजप हमसे डरती है, सभा तहवूâब करती है’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

पर्यावरण अहवालावरील सभा संपल्यानंतर जुलै महिन्याच्या कार्यपत्रिकेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी आम्हाला सभा तहकुबी द्यायची आहे, असे राष्ट्रवादीचे दिलीप बराटे आणि दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.  मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेले काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली वाहून सर्वसाधारण सभा तहवूâब करण्याची तहकुबी दिलीप बराटे यांनी वाचली. या सभेत येवलेवाडीचा डीपी असल्यामुळे विरोधी पक्षांनी तहकुबी दिल्याने ती स्वीकारायची की नाही? या विवचनेत भाजपचे पदाधिकारी पडले होते.

महापौर मुक्ता टिळक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी चर्चा करून तहकुबी स्वीकारली. महापौरांच्या आसनासमोरील टेबलावरच सत्ताधारी भाजपच्या वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर या नगरसेवकांनी  तहकुबीवर सह्या केल्या. त्यावर या तहकुबीत काय बदल केले हे वाचून दाखविण्याची मागणी  काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी केली. तहकुबी मान्य करण्यात आली. त्यावेळी  विरोधी पक्षनेते चेतन तुपे, नगरसेवक दिलीप बराटे यांनी या विषयावर बोलू देण्याची विनंती केली. मात्र, त्याकडे महापौर मुक्ता टिळक यांनी दुर्लक्ष करीत सभा तहवूâब केली. काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, प्रमोद नाना भानगिरे, पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्ता धनकवडे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक प्रकाश कदम, यांच्यासह शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘भाजप हमसे डरती है, सभा तहवूâब करती है’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले.

काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव
मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतलेल्या कै. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना पालिकेच्या वतीने २ लाख ९९ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी, असा प्रस्ताव शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे आणि नगरसेविका संगीता ठोसर यांनी स्थायी समितीला दिला आहे.