
सामना ऑनलाईन । मुंबई
यंदा गणपती बाप्पाचा प्रसादसुद्धा इको फ्रेंडली पद्धतीने दिला जाणार आहे. प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यांमधून प्रसाद देऊ नये तर प्रसाद देण्यासाठी बटर पेपर किंवा कागदाच्या द्रोणाचा वापर करावा असे निर्देश पालिका अधिकार्यांनी गणेश मंडळांना दिले आहेत.
गणेशोत्सवाला साधारण दीड महिना शिल्लक राहिला असून यंदा उत्सवात प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. प्लॅस्टिकबंदीची जबाबदारी असलेल्या उपायुक्त निधी चौधरी यांच्या दालनात सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. गणेशोत्सवाच्या काळात प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन होऊ नये म्हणून काही सूचना अधिकार्यांनी दिल्या. या बैठकीला समितीचे सदस्य ऍड. नरेश दहिबावकर, कुंदन आगासकर, गिरीश वालावलकर, सतीश नायक, शेणॉय, शिरीष मोदी, दिलीप खंडागळे, पुरुषोत्तम गजानन वर्तक हे उपस्थित होते.
कागदी मखरांच्या किमती आटोक्यात ठेवा
थर्माकोलला बंदी घातल्यामुळे कागदी किंवा पुठ्ठ्याच्या मखराच्या किमती वाढवण्यात आल्याकडे यावेळी समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे किमती मर्यादित ठेवण्यासाठी मखर तयार करणार्यांना विनंती करण्याचे आश्वासन यावेळी निधी चौधरी यांनी पदाधिकार्यांना दिले.
मूर्तीवरील प्लॅस्टिक आवरणाला बंदी नाही
गणेशाच्या आगमन व विसर्जनादरम्यान पावसापासून संरक्षण करण्यासाठी जे प्लॅस्टिक आवरण घातले जाते त्याला बंदी नसल्याचे यावेळी अधिकार्यांनी स्पष्ट केले. गणेश मंडळांना प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी अधिकार्यांनी समितीला केले.


























































