कलचाचणी सर्वेक्षणात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची शेतीला पहिली पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

लहानपणापासून डॉक्टर, इंजिनीयर होण्याची अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असली तरी पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी मात्र शेतीतज्ञ होण्यास पहिली पसंती दर्शवली आहे. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची कलचाचणी जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक ९.४५ टक्के मुलांनी शेतीतज्ञ होण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याखालोखाल हिंदुस्थनी सैन्य दल आणि पोलीस दलाला पसंती दर्शवून पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जाणीव दाखवून दिली आहे.

विद्यार्थ्यांना करीअरची दिशा ठरविता यावी या उद्देशाने मार्गदर्शन व समुपदेशन सत्रादरम्यान गेल्या वर्षी नववीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून विद्यार्थ्यांचा कल शेतीकडे अधिक असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. ‘अंतरंग फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या या मोफत स्वरूपाच्या उपक्रमाचा गेल्या वर्षी नववीत असणाऱया साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता.

या वर्षीही होणार सर्वेक्षण आणि समुपदेशन

या वर्षी देखील ६ ऑगस्ट २०१८ पासून या उपक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती उपायुक्त मिलीन सावंत यांनी दिली आहे. या उपक्रमादरम्यान गेल्या वर्षी नववीत शिकणाऱया सुमारे साडेबारा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यासाठीचा सर्व खर्च संबंधित स्वयंसेवी संस्थेद्वारेच केला जात आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांशी गटनिहाय संवाद साधून विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण व त्यांचा कल शास्त्राrय पद्धतीने अभ्यासला जातो. विद्यार्थ्याचा जो कल लक्षात येईल त्यानुसार अनुरूप असणाऱया अभ्यासक्रमांच्या माहितीसह नोकरी व व्यवसाय यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे उपायुक्त मिलीन सावंत यांनी सांगितले. या वर्षी नववीचे वर्ग असणाऱया २१० मनपा शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. हा उपक्रम मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कलचाचणीनुसार आवडीचे क्षेत्र

    क्षेत्र पसंती         टक्केवारी

  • शेतीतज्ञ           ९.४६टक्के
  • सैन्य दल          ७.३० टक्के
  • पोलीस दल       ७.२५ टक्के
  • पॅरामेडिकल      ६.९९ टक्के
  • अकाऊंटंट         ४.११ टक्के