बोलीभाषेची समृद्धी – सोलापुरी बोली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वर्णिका काकडे

सोलापूरची बोलीभाषा ही महाराष्ट्रातील एक अत्यंत वैशिष्टय़पूर्ण, गोड आणि बहुभाषिक प्रभावाने नटलेली भाषाशैली आहे. सोलापूर हे सीमाभागातील शहर असल्याने येथे मराठीसोबत कन्नड, तेलगू, उर्दू आणि हिंदी भाषांचा मोठा प्रभाव जाणवतो.

कन्नड आणि तेलगू भाषेच्या प्रभावामुळे सोलापुरी संवादात एक वेगळा हेल असतो. यात शब्द जोडताना किंवा उच्चारताना ‘अल्ला’, ‘गेल्ला’ अशा स्वरूपाचे उच्चार पाहायला मिळतात. प्रमाण मराठीपेक्षा काही शब्दांच्या लिंगात बदल जाणवतो (उदा. चहा, कॉफी किंवा ट्रकच्या लिंगाबाबत वेगळा वापर होतो). एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता आदर किंवा अनादराने ‘ह्यनं’, ‘तनं’ अशी सर्वनामे वापरली जातात.

शास्त्रीयदृष्टय़ा विचार करता सोलापुरी बोलीभाषा ही स्वतंत्र बोली ठरत नाही. कारण सोलापुरी भाषेची प्रमाणभाषेहून वेगळी अशी भाषिक रूपे सिद्ध झालेली नाहीत. बोलीभाषा ही प्रमाणभाषेहून दुसऱया भाषेइतकी वेगळी नसते; पण तिचे वेगळेपण जाणवते. असा वेगळेपणा सोलपुरी बोलीभाषेत जाणवत नाही. या बोलीभाषेत प्रमाणभाषेहून वेगळी जाणवणारी काही वैशिष्टय़े आहेत, पण ती सोलापूर शहरातील उद्योगधंदे, बहुभाषिक लोक यांमुळे तयार झाली आहेत.

बोलीभाषेत प्रमाणभाषेची अपभ्रंश रूपे वापरली जातात. ही रूपे प्रमाणभाषेपासून वेगळी सिद्ध होत नाही. ती आणखी एकदोन वर्ण येऊन आलेली आहेत. सोलापुरी बोलीभाषेत सर्वनामांची रूपे फार मजेदार होतात. उदाहरणार्थ हा – ह्यनं, एकवचनी रूप ह्यनी, तो – तनं, एकवचनी रूप, अनेकवचनी रूप त्यवनी. ते – एकवचनी; तनी – अनेकवचनी व आदरार्थी रूप त्येनी. या – ह्यवनी, त्या – त्यवनी अशी सर्वनामांची रूपे वापरली जातात. तसेच एकवचनी सर्वनाम रूपांचे ‘हे’, ‘ते’, ‘ह्यबक’, ‘त्यबक’ अशी नपुंसकलिंगी रूपे योजिली जातात. अशा स्वरूपांच्या नपुंसकलिंगी रूपांमधून न्यूनत्व, गौणत्व दर्शविले जाते; तर कधी नापसंती आणि तुच्छताही दर्शविली जाते.

सोलापुरी भाषेत हेलकारी शब्दांची योजना असते. कन्नड आणि तेलुगू या भाषांचा हा परिणाम. कानडीमध्ये ‘आ’कारान्त आणि ‘उ’कारान्त शब्दांत अधिक हेल आहेत. बंदिल्ला, उन्दिल्ला, बित्तील्ला, होगील्ला अशी ‘ल्ला’ युक्त म्हणजे ‘आ’कारयुक्त शब्दयोजना मोठय़ा प्रमाणात आहे. माडबेक्कू, होगाबेक्कू, उनबेक्कू, आडबेक्कू अशी आज्ञार्थी ‘ऊ’कारयुक्त शब्दरूपेही कानडीत मोठय़ा प्रमाणात आहेत.