
सामना ऑनलाईन, मुंबई
मराठा आरक्षणासाठी क्षणात अध्यादेश काढू शकतो पण ते आरक्षण न्यायालयात टिकणार नाही असे सांगतानाच कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण आमचे सरकार देईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
सह्याद्री अतिथीगृहात ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मराठा आरक्षणासाठी काही कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या लागतील आणि सरकार त्या निश्चितच पूर्ण करून आरक्षणाचा हा मुद्दा निकाली काढेल, असे फडणवीस म्हणाले. मराठा समाजाला आपलेच सरकार आरक्षण देईल असे ते म्हणाले. न्यायालयात टिकणारे आरक्षण हवे हे ज्या लोकांना कळते ते आज दडपणामुळे बोलू शकत नाहीत. पण ज्यांना कळत नाही त्यांना आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे हे भविष्यात नक्कीच कळेल, असे फडणवीस म्हणाले.
एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही
एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. मागासवर्ग आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची विनंती सरकारने केली असून अहवाल आल्यानंतर विधिमंडळाचे अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढता येईल असे ते म्हणाले. आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेली जाळपोळ आणि तरुणांच्या आत्महत्या व्यथित करणाऱया आहेत, असेही ते म्हणाले.


























































