उमेदवारांची संपत्ती, गुन्हे आता चौकाचौकात झळकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला आपली उत्पन्न, संपत्ती आणि आपल्यावर असलेले गुन्हे जाहीर करावे लागतात. ही यादी आधी मतदान केंद्रांवर लावली जायची. आता ही सर्व माहिती चौकाचौकात झळकणार आहे. मतदारांच्या जागरूकतेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सांगितले.

जळगाव तसेच मिरज-सांगली-कुपवाड येथे आज पालिका निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीआधी दोन दिवस मतदारांच्या जनजागृतीसाठी उमदेवारांच्या उत्पन्न, संपत्ती आणि गुन्हे यांची माहितीच चौकाचौकात झळकवण्यात आली. निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले असून आता राज्यभरातील निवडणुकांत हाच प्रयोग केला जाणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने २०१७ पासून उमेदवारांकडून संपत्तीचे दिले जाणारे प्रतिज्ञापत्र हे मतदान केंद्रांवर लावण्यास सुरुवात केली होती. मात्र आता ही माहिती चौकाचौकात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उमेदवाराविषयीची माहिती ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही टाकली जाते, मात्र या माहितीचा फायदा सर्वसामान्य मतदारांना घेता येत नाही.  त्यामुळे चौकाचौकात ही माहिती झळकवल्यास मतदान प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल, अशी प्रतिक्रिया निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.