
सामना ऑनलाईन । तिरुवनंतपुरम
लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी केरळ राज्य सरकारने २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यात शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयाचा खर्च राज्य सरकारमार्फत भरण्यात येणार आहे. ज्यांनी आधीच ही शस्त्रक्रिया केली असेल ते देखील या मदतीसाठी अर्ज करू शकतात, असं आवाहनही राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी फेसबुक पेजवर घोषणा केली की, कोणताही स्त्री अथवा पुरुष आपल्या इच्छेने लिंगपरिवर्तन करू शकते. या लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारा खर्च हा सरकारमार्फत दिला जाईल. या शस्त्रक्रियेसाठी सरकार प्रत्येक व्यक्तीला २ लाख रुपयांची मदत करणार आहे. त्यामुळे केरळ हे लिंगपरिवर्तनासाठी आर्थिक मदत देऊ करणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे.
२०१५मध्ये केरळ सरकारने तृतीय पंथीयांसाठी एक विशेष योजना कार्यान्वित केली होती. त्या योजनेअंतर्गत या जून महिन्यात केरळच्या उच्च शिक्षण विभागाने प्रत्येक सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमात तृतीय पंथीयांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच तृतीय पंथीयांना प्रशासकीय सेवांमध्ये समाविष्ट करण्यासाठी उत्तीर्ण व्हाव्या लागणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठीही सरकारतर्फे प्रशिक्षणवर्ग घेण्यात येत आहेत.






























































