विश्वविजेतेपदाची सिंधुला दुसऱ्यांदा हुलकावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नानजिंग

हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा २१-१९, २१-१० असा पराभव केला. सिंधूने सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठल्याने हिंदुस्थानींच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, यंदाही सिंधुला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही सिंधूला कॅरोलिना मरिनकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. पण आजच्या फायनलमध्ये सिंधूने १५-११ अशी आघाडी घेऊन पहिल्या गेमवर वर्चस्व राखलं होतं. त्यानंतर कॅरोलिना मरिनने आक्रमक खेळ करून सिंधूचं वर्चस्व मोडून काढलं. मरिनने इतक्या वेगाने गुण वसूल केले की, सिंधू तिच्यासमोर हतबल झालेली दिसली. अखेर मरिनने २१-१९, २१-१० असा विजय मिळवून विश्वविजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं.

यंदाचं वर्ष सिंधूसाठी विजेतेपदाच्या दृष्टीने निराशाजनक ठरलं आहे. इंडिया ओपन आणि थायलंड ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारूनही विजेतेपद तिच्यापासून केवळ एक पाऊल दूर राहिलं. अखेर पुन्हा एकदा तिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.