शांततेतील आंदोलन दुपारनंतर चिघळले; संभाजीनगरात तोडफोड, जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर शहरातील वाळूज औद्योगिक वसाहतीत दुपारपर्यंत प्रत्येक चौकात शांततेने सुरू असलेले आंदोलन दुपारनंतर चांगलेच चिघळले. औद्योगिक वसाहतीतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, कॉस्मो, बुस्टर, गुड इयर, सेन्टेक्स, क्राम्प्टन ग्रीव्हज, बीकेटीसह एकुण १२ पेक्षा अधिक कंपन्यांमध्ये आंदोलकांनी घुसखोरी करीत पार्किंगमध्ये उभी असलेली कामगारांची दुचाकी वाहने तोडफोड करीत पेटवून दिली. पोलिसांच्या वाहनांनावरही आंदोलकांनी जोरदार दगडफेक केली. वाहनांची तोडफोड केली. पोलिसांची ३ वाहने डिझेलच्या टाक्या फोडून पेटवून दिली. व्हेरॉक कंपनीजवळ पोलिसांची एक मोबाईल व्हॅन पेटवून दिली. जमाव नियंत्रणाबाहेर गेला व दोन पत्रकारांसह ४ पोलीस आंदोलकांच्या दगडफेकीत जखमी झाले.

हिंसक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. तसेच हवेत गोळीबारही केला. दरम्यान, वाळुज आणि उमरी येथील घटना वगळता मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बंद शांततेत पार पडला.