
सामना ऑनलाईन । सोनई
शनी अमवस्या निमित्त भरलेल्या यात्रेसाठी आज शनिशिंणापुरात भक्तांचा महापूर लोटला. शुक्रवारी दुपारी आमवस्यास प्रारंभ झाला. त्यानंतर रात्री भाविकांचा प्रचंड ओघ वाढल्याने पहाटेपासुन शनिशिंणापुरला जोडणार्या सर्वच रस्त्यावर गर्दी ओसंडुन वाहु लागली. आज सकळपासुनच महाद्वारा समोर दर्शनासाठी रांगा लागल्या. दर्शन रांगेत रेटा रेटी व गोंधळ उडत गेला. चौथर्याजवळ प्रचंड गर्दी झाल्याने पोलीस व देवस्थान सुरक्षायंत्रणा कोलमडली. पहाटे शनिदेवाचा प्रचंड जय जयकार व फटक्याची आतीशबाजीने यात्रेस प्रारंभ झाला. आज दिवसभर शनिदर्शनासाठी पाच लाखाहुन अधिक भाविकांनी हजेरी लावली. दरम्यान यात्रेचे सर्व नियोजन कोलमडल्याने भाविकांना मोठा फटका बसल्याचे दिसुन आले.
शुक्रवारी मध्यरात्री आदर्श गांवचे सरपंच पोपटराव पवार, सौरभ बोरा, ऑस्ट्रेलिया येथील भक्त राकेश कुमार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. तसेच पहाटेची आरती शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे, राहुल हेगडे, पीडी. पाटील व झिम्बॉब्वे येथील शनिभक्त जयेश शहा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. पहाटे ४ वाजल्यानंतर शनिमंदीराकडे भाविकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. शिर्डी मार्गे येणार्या भक्तांची वाहने मुळा साखर कारखाना येथे उभारण्यात आलेल्या वाहन तळावर थांबविण्यात आली. तसेच नगर-पुणे-संभाजीनगर येथुन येणारी वाहने ग्रामीण रुग्णालय येथे थांबविण्यात आली. दिवसभरात कमी अधिक प्रमाणात गर्दी असल्याने सायंकाळ पर्यंत तब्बल ५ लाखाहुन अधिक भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला.
वहातुकीचा बोजवारा
शुक्रवारी प्रारंभ झालेली आमवस्या ही अर्धी अमावस्या असल्या काराणाने भाविकांची गर्दी कमी प्रमाणात होणार असल्याचा देवस्थान व पोलीस प्रशासनाचा अंदाज फोल ठरला. परिणामी अर्धी अमावस्या असुनही भाविकांनी शनिशिंणापुरकडे धाव घेतल्याने प्रचंड गर्दी झाली. या गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन पुर्णपणे कोलमडले. मुळा साखर कारखाना येथे उभारलेले वाहनतळ पोलीस व स्वयंसेवक यांनी दुर्लक्ष केल्याने रत्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. वाहने विचित्र पद्धतीने रस्त्यावरच उभे केल्याने वहानतळापासुन दोन कि.मी पर्यंत रांगा लागल्या. त्यामुळे भाविकांना चार कि.मी अंतर पायी गाठावे लागले. वाहतुक व्यवस्थेचा पुर्ण बोजवारा उडाल्याचे दिसुन आले. यावेळी बॉम्ब शोध पधकाचे संदीप बावणे यांनी व त्यांच्या टीमने मंदिर परिसरात कसुन तपासणी केली. होमगार्ड पोलीस आदिंचा मोठा बंदोबस्त होता. रुण्गवाहिका, आरोग्य पथके, अग्नीशामक बंब आदि चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. शनिशिंणापुर देवस्थान राज्य सरकारने बरखास्त केल्याच्या पार्श्वभुमीवर मंदिर परिसरात विश्वस्त मंडळ अभावानेच दिसले. सर्व कामकाज प्रशासकीय कर्मचारी व अधिकार्यांच्या देखरेखीखाली झाले.


























































