भाजप व खासदार गांधींकडून शिवप्रेमींचा अपमान, शिवद्रोही छिंदमला छुपा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द व गलिच्छ भाषा वापरणार्‍या शिवद्रोही श्रीपाद छिंदमच्या कृत्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाईट शब्द काढणाऱ्या कोणालाही शिवसेना सोडणार नाही असा इशारा शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी दिला. तसेच छिंदमची पाठराखण खासदार दिलीप गांधीच करत असल्याचा आरोप शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, संजय शेंडगे, सुरेश तिवारी आदी उपस्थित होते.

शहर प्रमुख दिलीप सातपुते व संभाजी कदम म्हणाले, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक व खासदार दिलीप गांधी यांचा कट्टर समर्थक असलेल्या छिंदमच्या वक्तव्यामुळे भाजपाची अब्रू वेशीवर टांगली गेली. हे प्रकरण अंगलट आल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजीच खासदार गांधी यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन त्याची हकालपट्टी केल्याचा आणि त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केले. त्याच्या राजीनाम्याच्या प्रतीही त्यांनी माध्यमांना दिल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी 17 नोव्हेंबरला खासदार गांधी यांच्या कार्यालयातून त्यांच्याच कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची प्रत महापौर कार्यालयात व आयुक्तांच्या कार्यालयात दाखल केली. छिंदमच्या या कृत्याची भाजपाने गंभीर दखल घेत त्याचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे व त्याला पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर करत भाजपाविरोधात व स्वतःविरोधात निर्माण झालेला शिवप्रेमींमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न खासदारांनी केला. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी बोलाविलेल्या महासभेतही खासदार पुत्रांनी त्याचा नगरसेवक पदाचा राजीनामा आम्ही घेऊन येऊ, अशी वल्गना केली होती. मनपाच्या राजकारणात त्याला सक्रीय करणारे, अनेक गंभीर गुन्हे नावावर असताना त्याला मांडीवर बसवून उपमहापौर पदावर संधी देणाऱ्या खासदारांनी सरड्यासारखा रंग बदलत आता छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतला नसल्याची आवई उठविली आहे. पोलीस ठाण्यात महापौर व आयुक्तांविरोधात खोट्या तक्रारी करुन आजही शिवरायांचा सर्रास अपमान करणाऱ्या छिंदमच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेत भारतीय जनता पार्टी व खासदार दिलीप गांधी त्याला आजही छुपी साथ देत असल्याचे या वक्तव्यामुळे उघड झाले आहे.

छिंदमचा राजीनामा घेतल्याचे जाहीर करुनही तो महापालिकेकडे सादर न केल्याबाबत माध्यमांमधून टीकेची झोड उठडल्यानंतर खासदारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत राजीनामा पत्र महापालिकेत पाठविले. त्यावर प्रशासनाने कार्यवाही करुन निवडणूकही घेतली. त्यानंतर बुध्दी भ्रष्ट झालेल्या छिंदमला राजीनामा दिलाच नसल्याचा साक्षात्कार झाला. आता खासदारांनाही छिंदम सारखाच साक्षात्कार झालाय. माध्यमांसमोर उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्याचे जाहीर करणाऱ्या व तो महापालिकेकडे पाठविणाऱ्या खासदारांना छिंदमचा एवढा कळवळा का? छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो असे सांगणाऱ्या खासदारांवर बेडकासारखी कोलांटी उडी मारण्याची वेळ का आली? शिवद्रोही छिंदमला आजही खासदारांकडून छुपा पाठिंबा दिला असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. खासदारांच्या या कोलांटीउडी मुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्यांनी त्याला उपमहापौर पदावर बसवले त्यांनीच त्याचा राजीनामा घेण्याची नैतिक जबाबदारी होती. ती पार पाडल्याचा कांगावा खासदारांनी केला. आता पुन्हा घूमजाव करुन त्याचा राजीनामा घेतलेला नसल्याचे सांगणाऱ्या खासदारांनीही छत्रपती शिवरायांचा व तमाम शिवप्रेमींचा अपमान केला आहे. याची किंमत खासदार गांधी व त्यांच्या भाजपाला येत्या काळात मोजावी लागेल असे ते म्हणाले.

छिंदमची पाठराखण खासदार दिलीप गांधी करत असून नुकत्याच झालेल्या मनपाच्या सभेमध्ये छिंदमला पोलीस संरक्षण दिले गेले याच्यामागे दिलीप गांधीच असल्याचा आरोप सातपुते यांनी केला आहे. छत्रपतींचा अवमान करणार्‍याच्या पाठीशी हेच खासदार आहेत. उपमहापौर निवडणुकीच्या वेळी यांनी का अक्षेप घेतला नाही उलट मतदानाच्या वेळेत यांचेच नगरसेवक उपस्थित होते असे ते म्हणाले.