प्रार्थना, उपासना आणि भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. प्रदीप तराणेकर<<

प्रार्थना व उपासना करताना सर्वप्रथम भाव निर्माण करता आला पाहिजे. उत्स्फूर्तपणे सद्गुरूचरणी भाव समर्पण करता आला पाहिजे. बाजारात कोथिंबिरीची जुडी विकत घेतानादेखील भाव ठरवावा लागतो. अक्षरांची तोंडओळख होण्यासाठी शाळेची वाट धरावी लागते. तर आत्मज्ञानाच्या सत–चित–आनंदाच्या अनुभूतीसाठी सद्गुरूचरणी जायला हवे. मी आहे तेथे काहीही न करता स्वस्थ राहीन व सद्गुरू पूर्व प्रारब्धाने स्वतः येऊन दान देतील असा विचार करणे हा पलायनवाद आहे. नाना महाराज तराणेकर यांच्या आजच्या जयंतीनिमित्त प्रार्थना आणि उपासनेचे महत्त्व विशद करणारा लेख.

आत्मस्थित असलेला मनुष्य हा या जीवनाच्या परमोच्च स्थितीला प्राप्त होतो असे वैदिक विचारवंत वारंवार सांगत असतात. अशी व्यक्ती नेहमी दैवी अनुभव घेत असते व त्यात निमग्न असते. नित्य कर्मातच त्याला दैवी गुणांची प्राप्तीदेखील निसर्गक्रमाने आपोआप होत जाते. त्यासाठी त्याला कोणतेही विशिष्ठ बाह्य प्रयत्न करावे लागत नाहीत. तो स्वतःच सिद्ध होतो. ज्याप्रमाणे मुळाला पाणी घातले तर ते फांद्या-फांद्यातून, पाना-फुलांतून आपोआप पसरत जाते, त्याप्रमाणे अशा व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्ती व सभोवतालचा परिसर यांनाही अद्भुत आनंदाची प्राप्ती होत असते. त्यांच्या संपर्कात सर्व लोक तृप्त व संतुष्ट होऊन राहतात. नानामहाराज हे या अवस्थेचे प्रत्यक्ष अनुभविक प्रमाण आहेत. म्हणून ज्या सद्गुरूंनी अशा स्थितीचा अनुभव घेतला व शिष्यांना प्रत्यय आणून दिला आहे त्यांनी सांगितलेल्या उपासना पद्धतीवर दृढमूल राहणे हेच शिष्यांचे व भक्तांचे परम ध्येय असले पाहिजे.

शेवटी, अध्यात्ममार्गाकडे वाटचाल करताना, मनावर नियंत्रण, मनाची एकाग्रता व मनाची धारणाशक्ती वाढविणे हेच निसर्गदत्त प्रमुख साधन मानवाला मिळाले आहे. तेव्हा आपण जर नाना महाराजांच्या उपासना पद्धतीचे परिशिलन केले तर त्यातले वैशिष्टय़ हे नाना महाराजांच्या सन्निध होणाऱ्या नित्य कार्यक्रमातून सहज दिसून येते. ते म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कठोर साधनेत देह न शिणविता सहजसुलभ करुणात्रिपदी, पंचपदी, सामूहिक जप, पाठ इत्यादी मार्गाने व्यक्तीचे वा समूहाचे मानस अंतर्मुख करणे व नियमितपणे केलेल्या या विशिष्ट कर्माचरणांमुळे विचारांचे व बुद्धीचे केन्द्रियीकरण करणे हेच नाना महाराजांच्या उपासना पद्धतीतील महत्त्वाचे तर्कशुद्ध गमक आहे. उपरोक्त वैशिष्टय़पूर्ण त्रिपदी स्त्राsत्रपाठ व सामूहिक जपामुळे मनाच्या धारणाशक्तीची जी उन्नत अवस्था आहे, इतकेच नव्हे तर जेथे त्रिपदी होईल तेथे आम्ही उपस्थित राहू असा प्रत्यक्ष दत्त महाराजांचा व माझ्या सद्गुरूंचा, म्हणजेच प.पू.श्री.नाना महाराजांचा निर्वाळा आहे. हेच नाना महाराजांच्या उपासना पद्धतीचे, सामूहिक करुणा त्रिपदीचे व जपाचे एकमेवाव्दितीय अद्भुत सामर्थ्य आहे.

करुणा त्रिपदीचे महत्त्व

श्री गुरुमूर्ती चरित्रांत करुणात्रिपदीचे महत्त्व काय आहे याचे सर्व भाविकांना अतिशय उद्बेधक असे वर्णन दिसून येते. मंत्ररूप, प्रासादिक व दत्तभक्तांस प्रत्यक्ष प्रमाण असणाऱ्या या श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यांच्या वरद चरित्रग्रंथात ओवी क्रमांक ४० ते ५३, अध्याय ९२ ह्यांत करुणात्रिपदीचे महत्त्व विशद केले आहे. त्यातील महत्त्वाच्या ओळी अशा-

आपत्ति येतां श्रद्धापूर्वक।

या त्रिपदीचे पाठ देख।।

एकविंशतीवार निःशंक।

नित्य करितां एकनिष्ठsनें ।।५०।।

आपत्तीचे होत निरसन।

तैसेंच व्याधीग्रस्तासी जाण।।

एकविंशतीवार नित्य श्रवण।

दत्तत्रिपदी ऐकवितां।।५१।।

व्याधी पासूनियां तो रोगी।

मुक्त होईल जाणिजे वेंगी।।

परी श्रद्धा पाहिजे अंगी।

श्रद्धेसमान फल लाभे।।५२।।

करुणात्रिपदीचें हे फल।

निवेदिलें भक्त हो सकळ।।

यास्तव त्रिपदे सर्वकाळ।

दत्त दयाळ स्तवावा।।५३।।

श्री गुरुमूर्ती चरित्र।। अध्याय – ९२

याचा संक्षिप्त भावार्थ असा :

काही आपत्ती येता जो नित्य एकवीस वेळा श्रद्धायुक्त अंतःकरणाने, मनात कोणतीही शंका न आणता या त्रिपदीचे पठण करेल त्याच्या आपत्तींचे पूर्ण निरसन होईल.

तसेच पूर्ण श्रद्धावंत अंतःकरणाने जो या त्रिपदीचे एकवीस वेळा श्रवण करेल त्याची व्याधी दूर होऊन तो निरोगी होईल व त्याला व्यथामुक्ती लाभेल.

भक्तांसाठी करुणात्रिपदीचे हे तात्कालिक फळ निवेदन केले आहे. परंतु सौख्य व सद्गुरूकृपा ह्यांचा लाभ होण्यासाठी भक्तांनी नित्य नियमाने सर्वकाळ ह्या त्रिपदी पाठाने दत्तगुरूंचे स्तवन करावे.

म्हणजेच त्रिपदी नियमितपणे म्हणत जा, ही कृपावंत सद्गुरूंचीच आज्ञा आहे व श्री नाना महाराजांचेही आग्रहपूर्वक हेच सांगणे आहे. म्हणून आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करूया व सद्गुरूंना प्रिय होण्याचे प्रयत्न करूया.

श्रद्धा आणि दृढ निश्चय पाहिजे,

हे जेथे आहेत तेथे यश हे आहेच.

प्रार्थना व उपासना करताना सर्वप्रथम भाव निर्माण करता आला पाहिजे. उत्स्फूर्तपणे सद्गुरूचरणी भाव समर्पण करता आला पाहिजे. बाजारात कोथिंबिरीची जुडी विकत घेतानादेखील भाव ठरवावा लागतो. अक्षरांची तोंडओळख होण्यासाठी शाळेची वाट धरावी लागते. तर आत्मज्ञानाच्या सत-चित-आनंदाच्या अनुभूतीसाठी सद्गुरूचरणी जायला हवे. मी आहे तेथे काहीही न करता स्वस्थ राहीन व सद्गुरू पूर्व प्रारब्धाने स्वतः येऊन दान देतील असा विचार करणे हा पलायनवाद आहे.