
सामना ऑनलाईन । लंडन
लंडनमध्ये संसदेच्या बाहेरील कारचा अपघात हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता गृहीत धरून स्कॉटलंड यार्डने चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी एका कारचालकाने संसद भवनाच्या आवारात घुसखोरी करून संरक्षक कठडय़ांना जोरदार धडक दिली होती. वेस्टमिनिस्टरच्या बाहेर झालेल्या या अपघातात तीन सायकलस्वार जखमी झाले आहेत. या प्रकरणात 20 वर्षांच्या एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित कारने सायकल चालकांना धडक दिली. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या जीवाला धोका नाही, अशी माहिती लंडन ऍम्ब्युलन्स सर्व्हिसने दिली आहे.
‘हा अपघात आम्ही दहशतवादी हल्ल्याचा प्रकार म्हणून पाहत आहोत. पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथक या हल्ल्याचा तपास करत आहे. कारण घटना प्रत्यक्ष पाहणाऱयांनी रूपेरी रंगाच्या कारने जाणीवपूर्वक लोकांना धडक दिली असे म्हटले आहे.’ – स्कॉटलंड यार्ड पोलीस




























































