खंडणी मागितल्या प्रकरणी मनसेच्या एकमेव नगरसेवकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-turde-mns

सामना प्रतिनिधी । मुंबई

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात शौचालय बांधकामाचे कंत्राट घेणाऱया कंत्राटदाराच्या सुपरवायझरला 50 हजारांच्या खंडणीसाठी धमकावून त्याला जबर मारहाण केल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी मनसेचा एकमेव नगरसेवक संजय तुरडे आणि त्यांच्या अन्य तिघा साथीदारांना अटक केली आहे.

जगदीश (नाव बदललेले) यांनी या बांधकामाचे कंत्राट घेतले असून अमोल (नाव बदललेले) हे कामाच्या ठिकाणी सुपरवायझरचे काम करतात. सोमवारी तुरडे यांचे साथीदार मनीष येलकर, सचिन सोनवणे आणि स्वप्नील जगताप यांनी जबरदस्तीने अमोलला तुरडे यांच्या कार्यालयात नेले. याठिकाणी 50 हजार दे अशी दमदाटी तुरडे आणि सर्वजण करू लागले, मात्र अमोल यांनी त्यांना नकार देताच सर्वांनी त्यांना बेदम मारले. याप्रकरणी अमोल यांनी तक्रार दिल्यानंतर कुर्ला पोलीस ठाण्यात नगरसेवक संजय तुरडे, मनीष, सचिन आणि स्वप्नीलसह साथीदारांना खंडणी, मारहाण, दमदाटी आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना कोर्टात हजर केले असता 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले.