
>> प्रभाकर पवार
‘मुद्दसर हुसेन सय्यद उैर्फ मुन्ना झिंगाडा (50) हा आमचा नागरिक आहे. आमच्याच देशात त्याचा जन्म झाला. आमच्याकडे त्याच्या शाळेचा दाखलाही आहे असा थायलंड न्यायालयात दावा करणाऱया पाकिस्तानची मागणी गेल्या आठवडय़ात धुडकावण्यात आली. त्यामुळे छोटा शकीलचा मुंबईतील जोगेश्वरीचा हस्तक मुन्ना झिंगाडा लवकरच मुंबई क्राइम ब्रँचच्या ताब्यात येणार आहे. राजेंद्र सदाशिव निकाळजे उैर्फ छोटा राजन हा बँकॉक येथे वास्तव्याला असल्याची खबर पाकिस्तानस्थित छोटा शकीलला मिळाल्यानंतर त्याने जोगेश्वरीच्या मुन्ना झिंगाडा यास बँकॉक येथे पाठविले होते. छोटा राजन कुठे राहतो, त्याला कोण कोण भेटतात याची माहिती छोटा शकीलला मिळाल्यानंतर त्याने मुन्ना झिंगाडा यास छोटा राजनच्या घरी पाठविले. त्याने घराची बेल वाजविली. 15 सप्टेंबर 2000 चा तो (शुक्रवार) दिवस होता. छोटा राजनच्या सोबत त्याचा जवळचा साथीदार रोहित वर्मा हाही घरात होता. रोहितने दरवाजा उघडताच मुन्ना झिंगाडाने आपल्याकडील स्टेनगनने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात रोहित वर्मा हा जागीच ठार झाला, तर छोटा राजनने प्रसंगावधान राखून घरातील मागच्या खिडकीतून उडी मारून आपला जीव वाचवला. तरीही त्याच्या मांडीला व पोटातील आतडय़ाला गोळय़ा लागल्या. गंभीर जखमी झालेल्या छोटा राजनला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱया मुन्ना झिंगाडा यास तेथील सुरक्षा रक्षकांनी पकडून बँकॉक पोलिसांच्या ताब्यात दिले. तेव्हापासून गेली 18 वर्षे मुन्ना झिंगाडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात असून पाकिस्तान तो आपला नागरिक असल्याचा 2000 सालापासून दावा करीत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, पाकिस्तानने दाऊद टोळीला पाकिस्तानात आश्रय दिला आहे. गँगवॉर, खूनखराबा त्याच्याच पेरणेने मुंबईत सुरू होते व आजही आहे. आज मुंबईतील 200 च्या वर वॉण्टेड गुंड पाकिस्तानात वास्तव्याला आहेत. मुंबईतील बडे बडे व्यावसायिक आजही पाकिस्तानात दाऊदच्या दरबारात जाऊन आपली प्रकरणे मिटवून येतात. जोशी-धारीवाल हे गुटख्याचे व्यापारीही पाकिस्तानात दाऊदच्या दरबारात गेले होते हे मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर आजही आहे. तेव्हा दाऊदचे आज कुणालाच वावडे नाही. राजकारण्यांना तर नाहीच नाही. उद्या तो हिंदुस्थानात आला तर छोटा राजनप्रमाणे त्यालाही जेलमध्ये शाही वागणूक मिळेल हे कुणा ज्योतिष्याला सांगण्याची गरज नाही.
छोटा राजनवर बँकॉक येथे हल्ला झाल्याचे कळल्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचचे त्यावेळचे एसीपी शंकर कांबळे व पोलीस निरीक्षक हेमंत देसाई यांनी बँकॉकला प्रयाण केले. छोटा राजन ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता त्या समिती वेज सुकुमित या हॉस्पिटलला भेट देऊन छोटा राजनकडून हल्ल्याची माहिती घेतली व छोटा राजन हा आमचा आरोपी असून त्याला आमच्या ताब्यात द्या अशी बँकॉक पोलिसांकडे मागणी केली, परंतु बँकॉक पोलिसांनी मुंबई क्राइम बँचची मागणी धुडकावून लावली. ‘‘गुन्हा आमच्या देशात घडला आहे. मग खटलाही आमच्या देशात चालेल’’ असा युक्तिवाद करून मुंबई पोलिसांची मागणी फेटाळून लावली. तेव्हापासून मुन्ना झिंगाडा बँकॉक पोलिसांच्या ताब्यात असून पाकिस्तान त्याला ताब्यात घेण्यासाठी आजही जंग जंग पछाडत आहे. दाऊद टोळीसाठी तो किती महत्त्वाचा आहे हे पाकिस्तानच्या धडपडीवरून दिसून येत आहे. मुन्ना झिंगाडा हा आज ना उद्या मुंबई पोलिसांच्यात ताब्यात येईल तेव्हा दाऊद व छोटा शकीलची बरीच गुपिते बाहेर पडतील. त्यामुळेच पाकिस्तान मुन्ना झिंगाडा याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
बँकॉक हे छोटा राजनसाठी सुरक्षित समजले जात होते, परंतु तिथेही छोटा शकील पोचल्याने छोटा राजन घाबरला. हॉस्पिटलमध्येही बँकॉक पोलिसांना मॅनेज करून छोटा शकील आपला ‘गेम’ करील याची त्याला शंका आली. त्याने ताबडतोब संतोष शेट्टी, भरत नेपाळी, बंटी पांडे, फरीद तनाशा आदी साथीदारांना बँकॉक येथे बोलावून घेतले आणि त्यांच्या संरक्षणात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले. तरीही राजनची भीती काही कमी झाली नाही. स्थानिक पोलिसांवर त्याचा विश्वास नव्हता. त्याने संतोष शेट्टीला सांगितले, ‘‘किती खर्च आला तरी चालेल, परंतु मला या हॉस्पिटलच्या जेलमधून कसेही करून बाहेर काढा.’’ झाले, बॉसचा आदेश या चौकडीने तंतोतंत पाळला. छोटा राजनच्या संरक्षणासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांना भरत नेपाळीने भरपूर दारू पाजली व त्यात गुंगीचे औषध टाकून त्यांना झोपवून टाकले. त्यानंतर मध्यरात्री माऊंटन क्लायम्बिंगचे साहित्य आणून छोटा राजनला रुग्णालयाच्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून खाली उतरविले. राजनला काही करून बँकॉकमधून पळ काढायचा होता. त्याने कंबोडियाच्या लष्कराची मदत घेतली. त्यासाठी लाखो डॉलर ओतले. रुग्णालयाजवळ लष्कराची जीप आली. त्या जीपने छोटा राजनला कंबोडियाच्या सीमेवर व त्यानंतर हेलिकॉप्टरने तेहरानला सुरक्षित हलविण्यात आले. तेहरानमध्ये पोहचल्यानंतर छोटा राजनने पहिला काटा कुणाचा काढला असेल तर तो मुंबईतील हॉटेल मालक विनोद शेट्टीचा! त्यानेच दाऊदचा ब्रेन शरद शेट्टीला टीप देऊन बँकॉक येथे हल्ला केला अशी कुणीतरी माहिती छोटा राजनला दिली. त्यानंतर छोटा राजनने जे काही सूडचक्र सुरू केले ते थांबले नाही. आपल्यावरील हल्ल्यानंतर छोटा राजनने आपल्याच हस्तकांना मोठय़ा प्रमाणात मारले. त्याला बँकॉक येथून हलविणारे, त्याला वाचविणारेच त्याचे शूत्र झाले. छोटा राजन एकाकी पडला. त्याच्या जिवाचा धोका वाढला. त्यामुळेच त्याने 2015 साली हिंदुस्थानात परतण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांच्या हत्येप्रकरणी त्याला नुकतीच जन्मठेप झाली आहे. एका पत्रकार महिलेच्या नादाला लागून छोटा राजनने जे.डें.सारख्या एका निरपराध पत्रकाराचा नाहक बळी घेतला. त्यामुळेच त्याच्यावर आज आजन्म कारावास भोगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नियती, भोगा आपल्या कर्माची फळे! दुसरे काय!





























































