
सामना ऑनलाईन । वाशिंग्टन
वाशिंग्टनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील चर्चमधील 300 पादरींनी तब्बल एक हजार लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पेनसिल्व्हेनिया सुप्रीम कोर्टाने मंगळवारी कॅथलिक चर्चमधील पादरींनी केलेल्या अत्याराचावर एक ग्रँड ज्यूरी रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, 300 पेक्षा जास्त पादरिंनी गेल्या 70 वर्षात एक हजारपेक्षा जास्त मुलामुलींचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच त्यांनी आपला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला, असेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
स्टेट अटॉर्नी जनरल जोश शॅपिरो यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, या चर्चमधील पादरींनी अत्याचार केलेल्या एक हजार पीडित मुलांची ओळख पटवण्यात आली आहे. परंतु, पेनसिल्व्हेनिया सुप्रीम कोर्टाच्या ग्रँड ज्यूरींनी या आकडेवारी विषयी शंका व्यक्त केली आहे. पीडित मुलामुलींची संख्या यापेक्षा अधिक असावी असा दाट संशय आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या मते अमेरिकेतील कॅथलिक चर्चमधील लैंगिक शोषणाची ही सर्वात मोठी घटना असून तब्बल १८ महिने या प्रकरणी चौकशी सुरू होती. स्टेट अॅटॉर्नी जनरल जोश शॅपिरो यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरू होती. यात हॅरिसबर्ग, पीट्सबर्ग, ऐलेनटाऊन, स्क्रॅनटन, एरी आणि ग्रीन्सबर्ग जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.
पेनसिल्व्हेनिया सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी 1400 पानांचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी चर्चच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे अत्याचाराचे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला आहे. रिपोर्टनुसार पादरींनी मुलं आणि मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. यातील काही प्रकरणं तर इतकी जुनी झाली आहेत की आता त्यावर केसही दाखल करता येत नाही, असे शॅपिरो यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक पादरींनी आपला गुन्हा कबूल केला असून काहींनी आम्हाला मदत करा, असे आवाहन केले आहे. या रिपोर्टनुसार एका पादरीने 9 वर्षाच्या मुलावर ओरल सेक्ससाठी दबाव टाकला आणि त्यानंतर त्याचे तोंड पवित्र पाण्याचे धुतले. तर एका पादरीने ७ वर्षीय मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या नावाखाली अत्याचार केल्याचे कबूल केले आहे. तसेच काही पादरींनी रिपोर्टमध्ये आपली नावं नमूद करू नका यासाठी हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. नाव जाहीर झाल्यास आमची नाचक्की होईल असे पादरींनी म्हटले आहे.


























































