
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पेट्रोल डिझलच्या वाढत्या दरांवरून अनेकवेळा अटल बिहारी वाजपेयी यांनी विरोधी पक्षात असताना सरकारविरोधात आंदोलनं केली आहेत. मात्र त्यांचे एक आंदोलन कायम लोकांच्या लक्षात राहण्यासारखे आहे. इंधनाच्या वाढत्या दराचा विरोध करण्यासाठी अटलची चक्क बैलगाडी घेऊन संसदेत पोहोचले होते.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७३ साली हिंदुस्थानात पेट्रोल डिझेलचे भाव खूप वाढले होते. देशातील विरोधी पक्षांनी त्यावरून इंदिरा गांधीनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यावेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन देखील सुरू होते. ते अधिवेशन सुरू असताना अटलजी एकदा थेट बैलगाडी घेऊन संसदेत पोहोचले तेव्हा साऱ्यांनीच त्यांच्या अनोख्या आंदोलन शैलीचं कौतुक केलं होतं. तर एकदा ते सायकलवर आले होते. त्यामुळे अटलजींच्या सरकार विरोधी आंदोलनांची संसदेत प्रचंड चर्चा व्हायची.

























































