
सामना ऑनलाईन । कोयना
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने रविवारी पहाटे पासुन कोयना धरणातून होणारा विसर्ग वाढवला आहे. कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे 4 फुटाने उघडले असून धरणातून कोयना नदीत प्रति सेकंद 45 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
विसर्ग वाढल्याने कोयना नदीवरील मूळगाव पूल पाण्याखाली गेला असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाटण, कराड व सांगली शहरातील नागरिकांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान, कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105 टीएमसी असून आतापर्यंत धरणात 102 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणात ज्याप्रमाणात पाण्याची आवक होत आहे, त्याच प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.


























































