साईबाबा संस्थानचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा, 40 कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
समाधी मंदिरात साईभक्तांमार्फत करण्‍यात आलेली आकर्षक फुलांची सजावट.

सामना ऑनलाईन । मुंबई

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचा दहा मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीव्ही तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा वीज प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या तब्बल 39 कोटी 95 लाख रुपयांच्या खर्चास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष वीज प्रकल्प उभारण्याच्या कामास सुरुवात होणार आहे.

अपारंपरिक ऊर्जा धोरणांतर्गत राज्यात तब्बल 7500 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. त्यानुसार साईबाबा संस्थानने दहा मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्याच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली आहे. या वीज प्रकल्पातून वर्षाला सुमारे 190 युनिटपर्यंत वीजनिर्मिती होऊ शकणार असून ती महावितरणला पुरवली जाणार आहे. त्यामधून संस्थानने वापरलेली वीज वजा होऊन उर्वरित विजेचे संस्थानला पैसे मिळणार आहेत. या प्रकल्पातून 25 वर्षांपर्यंत वीजनिर्मिती होऊ शकणार आहे.