शक्तिशाली हिंदुस्थान वाजपेयींमुळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केलेल्या ‘पोखरण’च्या अणुचाचणीमुळेच जगात एक शक्तिशाली राष्ट्र अशी हिंदुस्थानची ओळख निर्माण झाली, असे सांगतानाच वाजपेयींमुळेच जगात दहशतवादावर चर्चा सुरू झाल्या, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधील प्रार्थनासभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, सुरुवातीच्या काळात हिंदुस्थानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जम्मू-कश्मीरप्रश्नी उत्तरे द्यावी लागत असत. जेव्हा वाजपेयी यांना या प्रश्नावर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी कुशलतेने हा प्रश्न हाताळला. त्यानंतर जगभरात दहशतवादावर चर्चा होऊ लागली. दहशतवादाच्या विरोधात कोण आहे आणि दहशतवादाला कुणाचा पाठिंबा आहे यावर जगभरात बोलले जाऊ लागले. अटलबिहारी वाजपेयी हे केवळ नावापुरते अटल नव्हते तर व्यवहारातदेखील ते अटलच असल्याचे स्पष्ट दिसून येते. 11 मे 1998मध्ये पोखरणमध्ये अणुचाचणी करीत त्यांनी संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला.

65 वर्षांची मैत्री – आडवाणी
अटलबिहारी वाजपेयी यांची आणि आपली मैत्री 65 वर्षे जुनी होती असे सांगतानाच अटलजी उपस्थित नसलेल्या अशा सभेत बोलण्याची वेळ आपल्यावर येईल अशी कल्पनाही कधी केली नव्हती असे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी आपल्या भाषणात म्हणाले. मी किती दिवस राहीन असे वाजपेयी कधी कधी विचारायचे तेव्हा मनाला खूप यातना व्हायच्या असे त्यांनी सांगितले.

अटलजी कायम सोबत राहतील – भागवत
अटलबिहारी वाजेपयी आज हयात नसले तरी त्यांची भाषणे, कविता, विचार या रूपाने ते कायम आपल्या सोबत राहतील असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले.

summery- narendra modi praises atal bihari vajpayee on pokhran