पत्रे कोपून चोर मुख्य रस्त्यावर दोन दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नांदेड 

पत्रे कापून चोरी करणाऱ्या चोरटयांनी आता इतवारा ठाण्याची हद्द सोडून वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली कलाकारी केली आहे. आज सकाळी वजिराबाद भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानाचे तीन पत्रे कापून चोरटयांनी आपला हात दाखवला आहे. पोलिसांनी लगेच त्या घटनास्थळी पोहचून कार्येशीर प्रक्रिया सुरु केली आहे.

आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान वजिराबाद भागातील मुख्य रस्त्यावर असलेले आसाम टी कंपनीचे मालक आपली दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांना आपल्या दुकानावरील पत्रे कापलेला दिसला. तेव्हा त्यांनी लगेच वजिराबाद पोलीस ठाण्यास ही माहिती कळवली. पोलीस उप निरीक्षक मनोज पांडे,पोलीस हवालदार सवंडकर,पोलीस कर्मचारी मोहनसिंह सिंगल आणि पाईकराव त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केली असतांना चोरटयांनी अनोखी या कापड दुकानाचे  पत्रे कापून आत प्रवेश मिळवला आणि मग आसाम टी कंपनीला टार्गेट केले. या दुकानातून काय काय चोरी झाले याची माहिती वृत्त लिही पर्यंत मिळू शकली नाही.

वजिराबाद पोलिसांनी लगेच श्वान पथकाला पाचारण केले होते. तेथे सापडलेल्या एका हातोडीच्या साहाय्याने श्वानाने त्या दुकानांच्या मागील रस्त्यापर्यंत मार्ग काढला होता. पण तेथे पाणी साचलेले असल्याने त्या पाण्यातून चोरटे पुढे गेले असतील आणि श्वानाचा नाईलाज झाला. प्राप्त माहितीनुसार अनोखी या कापड दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

सर्व तिन्ही दुकानदार आपल्या कडील ऐवजाचे सर्वेक्षण करीत आहेत. त्यानंतर काय आणि किती चोरी झाली याबाबत तक्रार दिली जाणार आहे. चोरटयांनी आता तीन पत्रे असलेली दुकानच फक्त टार्गेट केल्याचे दिसत आहे.