
सामना ऑनलाईन । मुंबई
परळच्या ‘क्रिस्टल’ टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांना नाहक जीव गमवावा लागल्यानंतर बेघर झालेल्या रहिवाशांची ‘घरघर’ सुरू झाली आहे. या इमारतीला ‘ओसी’ नसल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने वीज-पाणी कापल्यानंतर रहिवासी कुणी नातेवाईकांकडे तर कुणी भाड्याच्या निवार्यासाठी वणवण करीत आहेत. बिल्डरने ‘ओसी’ असल्याचे सांगून आपल्याला फसवल्यामुळेच आपला घात झाल्याचे रहिवासी सांगत आहेत.
‘क्रिस्टल’ला आग लागल्यानंतर ही संपूर्ण 17 मजली इमारत रिकामी करण्यात आली आहे. मात्र अचानक घर रिकामे करावे लागल्याने ऐनवेळी राहायला जागा कुठे मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच संसाराचे संपूर्ण सामान दुसर्या ठिकाणी नेण्याची कसरत करावी लागत आहे. रहिवासी आज सकाळपासून आपल्या संसाराचे सामान घेऊन नव्या जागेच्या शोधात निघाले आहेत. इतकी वर्षे वास्तव्य केलेले घर अचानक सोडावे लागल्याचे दुःख रहिवाशांकडून व्यक्त होत होते.
रहिवाशीच करणार सफाई
इमारतीला आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे, मात्र या ठिकाणी अद्याप पालिका किंवा बिल्डरकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण इमारतीची स्वच्छता प्रतिकुटुंब दहा हजार रुपये काढून करण्याचा निर्णय रहिवाशांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे रहिवासी अनिल काळे यांनी सांगितले.
निकृष्ट दर्जाच्या वायरिंगमुळे आग?
‘क्रिस्टल’ टॉवरमध्ये इलेक्ट्रिक वायरिंगसाठी वापरण्यात आलेल्या वायरचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय प्रत्येक इमारतीत असणारे दोन एसी, गिझर, कॉम्प्युटर अशा अनेक वस्तूंमुळेच लोड वाढल्याने शॉर्टसर्किट झाले असावे असेही बोलले जात आहे.
काही झाले तरी इथेच राहणार
स्वतःच्या मेहनतीने घेतलेले हे घर आहे. शिवाय या वयात दुसरे घर घेण्याची आपली आता ऐपतही नाही. त्यामुळे दुसरीकडे जागा शोधण्याचा प्रश्नच नाही. काही झाले तरी इथेच राहणार. – राजिंदर कपूर (73), रहिवासी
आम्ही या ठिकाणचे 1942 पासूनचे रहिवासी आहोत. पुनर्विकासानंतर आम्ही याच ठिकाणी राहत आहोत. त्यामुळे ही जागा सोडणे शक्यच नाही. मात्र आता घडलेल्या घटनेमुळे सांताक्रुझ येथे नातेवाईकांकडे तात्पुरते राहण्यासाठी जात आहोत. – लायनर डिसोजा, रहिवासी
चौदाव्या मजल्यावर आमचा फ्लॅट आहे. मात्र आता घर रिकामे करावे लागणार असल्यामुळे सांताक्रुझ येथे नातेवाईकांकडे तात्पुरते राहण्यास जात आहे. या ठिकाणची सर्व व्यवस्था कधीपर्यंत होईल याबाबत कुणीच काही सांगत नाही. त्यामुळे सगळं पुन्हा ठीक होईपर्यंत राहण्यासाठी शोधाशोधच करावी लागणार आहे. – अनिरुद्ध जैन, रहिवासी
अशी झाली फसवणूक
‘क्रिस्टल’ टॉवरमध्ये एकूण 48 कुटुंबे राहत होती. 2005 मध्ये पुनर्विकास सुरू झाल्यानंतर 2015 मध्ये रहिवासी या ठिकाणी राहायला आले. यावेळी बिल्डरने रहिवाशांना इमारतीला ‘ओसी’ असल्याचे सांगत इतर अनिवार्य बाबींची पूर्तता केली असल्याचे सांगितले. त्यामुळेच आपण या ठिकाणी राहायला आल्याचे रहिवासी ऍड. गुणरत्न सदावर्दे यांनी सांगितले.
मालकाला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
क्रिस्टल टॉवरचा बिल्डर आणि मालक असलेल्या अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला याला काल मध्यरात्री अटक करून आज भोईवाडा महानगर दंडाधिकारी कोर्टात उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदोष मनुष्यवध तसेच दुसर्यांच्या जीविताला हानी पोहोचेल असे कृत्य करणे अशा ‘आयपीसी’च्या विविध चार कलमांतर्गत भोईवाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
खापर रहिवाशांवर, पालिकेवर फोडले
इमारतीच्या फायर सिक्युरिटीची जबाबदारी रहिवाशांची आहे, असे सांगत बिल्डर सुपारीवाला याने दुर्घटनेला रहिवाशीच कसे जबाबदार आहेत, असे न्यायालयात सांगण्याचा प्रयत्न केला. 2012पासून आम्ही रहिवाशांना सोसायटी स्थापन करायला सांगितले. पण त्यांनी ती स्थापन केली नाही. सोसायटी स्थापन करून कमिटीने आपली फायर यंत्रणा उभारायला हवी होती, असा दावा सुपारीवालाच्या वकिलाने केला. तसेच 2012ला आम्ही ओसी आणि फायर सिक्युरिटी प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करत होतो,पण ते मिळाले नाही, असे सांगत महानगरपालिकेवरही खापर फोडले.
























































