मध्यम प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी , धुळे

धुळे जिल्हय़ातील 12 मध्यम आणि 47 लघु प्रकल्पांची साठवण क्षमता 494.86 दशलक्ष घनमीटर आहे. आज अखेर त्यामध्ये 172.42 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्हय़ातील पांझरा, मालनगाव, जामखेली हे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर शिंदखेडा तालुक्यातील सोनवद, वाडी-शेवाडी, अमरावती या मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे या मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा अद्यापही पाणीसाठा निर्माण झालेला नाही. सर्वच मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये क्षमतेएवढा पाणीसाठा होण्यासाठी जिल्हय़ाला जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जिल्हय़ाचे सरासरी पर्जन्यमान 550 मिलिमीटर आहे. बुधवारअखेर धुळे आणि साक्री तालुका वगळता इतर दोन्ही तालुक्यांत सरासरी इतका पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्रात काही दिवस पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत गेली. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जिल्हा प्रशासनाला उन्हाळय़ातील संभाव्य पाणीटंचाईने ग्रासले होते, मात्र 15 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे सहा दिवस रिमझिम पाऊस झाल्याने काही मध्यम प्रकल्प आणि लघु प्रकल्पांच्या साठवण क्षमतेत वाढ झाली. तसेच पावसामुळे माना टाकणाऱया पिकांना उभारी मिळाली. पांझरा मध्यम प्रकल्प, मालनगाव आणि जामखेली मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले आहेत.

बुराई मध्यम प्रकल्पाची क्षमता 14.21 दशलक्ष घनमीटर असून या प्रकल्पात 5.39 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. करवंद प्रकल्पाची क्षमता 28.26 असून त्यात 5.84, अनेर प्रकल्पाची क्षमता 49.27 असून आज अखेर त्यात 26.70, अक्कलपाडा प्रकल्पाची क्षमता 28.82 दशलक्ष घनमीटर असून त्यात 40.62 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. तापी नदीवरील सुलवाडे मध्यम प्रकल्पाची क्षमता 65.06 असून त्यात 13.67 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्हय़ातील 12 मध्यम प्रकल्पांची एकुण क्षमता 372.89 असून प्रत्यक्षात मात्र 151.52 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. मुकटी मध्यम प्रकल्पाची क्षमता 10.19 असून त्यात केवळ 1.98 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जिल्हय़ात 47 लघु प्रकल्प असून त्यांची क्षमता 129.97 दशलक्ष घनमीटर आहे. या लघु प्रकल्पांमध्ये 20.89 दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठा आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता के.टी.सुर्यवंशी यांनी दिली. मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती पाहिल्यानंतर पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे, हे स्पष्ट होते.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पांझरा मध्यम प्रकल्पाची क्षमता 35.63 दशलक्ष घनमीटर आहे. तसेच मालनगावची क्षमता 11.33 तर जामखेलीची क्षमता 12.34 दशलक्ष घनमीटर आहे. या क्षमतेइतका पाणीसाठा तीनही प्रकल्पांमध्ये निर्माण झाला आहे. कान्होली, सोनवद, वाडी-शेवाडी आणि अमरावती या चार मध्यम प्रकल्पांच्या पानलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे या चारही मध्यम प्रकल्पांच्या पाणीसाठय़ात वाढ झालेली नाही.