
सामना प्रतिनिधी । इगतपुरी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात इगतपुरी नगर परिषदेला 3 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018 अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांमधून मात्र इगतपुरी नगर परिषद प्रशासनाला या सर्वेक्षणाचा विसर पडला असल्याचे पाहावयास मिळाले. शहराच्या बायपास असलेल्या मुंबई-आग्रा मार्गालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नाशिक जिल्हा क्रमांक एकवर यावा यासाठी शासकीय स्तरावर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू असल्याचे दिसते आहे. मात्र अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्री दत्त मंदिरलगतच मोठय़ा प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे याच भागातील जोगेश्वरी परिसरातील सांडपाणी याच रस्त्यावरील खड्डय़ात साचल्याने येथे तलावच निर्माण झालेला दिसत आहे.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत नाशिक जिह्यातील केवळ चार नगरपालिका प्रशासानाला हा निधी मंजूर झाला होता. यात इगतपुरी नगरपालिकेचाही समावेश आहे. या निधीतून विविध साहित्य विकत घेता येईल असे असताना शहरात मात्र घाणीचे साम्राज्य काही कमी होताना दिसत नाही. जोगेश्वरी या भागातील नागरिकांनी सांडपाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी करून अधिकारी या गंभीर समस्येकडे कानाडोळा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
हीच स्थिती इगतपुरीच्या ग्रामीण भागातदेखील आहे. विविध गावांत कचरा आणि मोठय़ा प्रमाणावर अस्वच्छता पाहता कोणत्या तोंडाने स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018 सुरू आहे हेच नागरिकांना समजेना. तालुक्यात काही भागांत स्वच्छ सर्वेक्षण योजना चांगल्या प्रकारे सुरू आहे तर काही ठिकाणी केवळ फोटोसेशन करून अॅपवर माहिती टाकून कामे केल्याचा दिखावा सुरू केला आहे.






















































