पुढचा पंतप्रधान कोण होणार? वाचा शरद पवार काय म्हणतायंत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील तोच पक्ष पंतप्रधानपदासाठी दावा सादर करील, तेच निवडणुकानंतरचे आघाडीचे गणित असेल’, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मला पंतप्रधान बनण्याची महत्वाकांक्षा नाही असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमध्ये बोलताना केले होते. राहुल यांच्या वक्त्यव्याचे स्वागत करताना पवार यांनी वरील गणित मांडले.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवार यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘राहुल यांच्या समजूतदार भूमिकेचे मी मनापासून कौतुक करतो. त्यांची भूमिका विरोधी पक्षांच्या आघाडीची सकारात्मकच आहे. आपले पहिले लक्ष्य आहे ते केंद्रात भाजपला सत्तेवरून दूर करणे. निवडणूक होऊन जाऊ द्या .मग एकत्र बसू आणि निवडणूक जिंकून सरकार स्थापनेचा विचार करू. आघाडीतील ज्या पक्षाचे जास्त खासदार निवडून येतील त्याच पक्षाचा नेता देशाचा पंतप्रधान होईल हा नैसर्गिक नियम असेल’, असेही प्रतिपादन पवार यांनी केले.

युपीएने 2004 मध्ये एनडीएला सत्तेवरून हटवले होते हे विसरू नका
2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य पक्षांच्या युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सने ( युपीए ) भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सत्तेवरून हटवले होते हे विसरू नका, असे सांगून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन केले. गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस मजबूत स्थितीत आहे. उत्तरप्रदेशात मायावत -अखिलेश यांचे पक्ष बलवान आहेत. प्रत्येक राज्यात परिस्थिती वेगळी आहे. भाजपला सत्तेवरून दूर करायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकजुटीने येती लोकसभा निवडणूक लढवायला हवी, असेही स्पष्ट मत पवार यांनी मांडले.