
सामना प्रतिनिधी । मुंबई
सरकारी कार्यालयांतही आता वीज बचतीचा नारा देण्यात आला आहे. कार्यालयांत एसीचे तापमान सर्रास 18 ते 20 डिग्रीवर ठेवण्यात येते. यामुळे विजेचा अनावश्यक वापर होत असून पर्यावरणाचीही हानी होत आहे. हे टाळण्यासाठी सरकारी कार्यालयांतील एसी ‘24 डिग्रीवर’च ठेवण्यात यावेत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व सरकारी कार्यालयांना देण्यात आले आहेत.
सरकारी कार्यालयांत एसी वापरण्यावर नियंत्रण यावे यासाठी सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयांत मोठय़ा प्रमाणावर विजेचा गैरवापर होत आहे. एसीचे तापमान 18 ते 20 डिग्रीपर्यंत ठवेण्यात येत असल्यामुळे सरकारचे आर्थिक नुकसानच होत आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने सुचविल्याप्रमाणे एसीचे तापमान 24 डिग्रीवरच ठेवण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
24 टक्के विजेची बचत
बाहेरून येणाऱया व्यक्तींना तापमानातील विषम बदलांना सामोरे जावे लागते. मात्र 24 डिग्री तापमान ठेवल्यास या बदलाला सामोरे जावे लागणार नाही. हे वातावरण पोषक ठरून मानवी शरीराला आवश्यक तापमान राहील. सरकारची ग्रीन बिल्डिंग संकल्पनाही प्रत्यक्षात उतरेल व 24 टक्के विजेची बचतही होईल, असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.
summary : public work department instructions for ac temperature





























































