पोलिसांनी जप्त केले एक हजार चारशे लीटर रॉकेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

शहरापासून जवळ असलेल्या गारमाळ परिसरातील एका घरावर हिंगोली शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास छापा टाकून १ हजार ४२२ लिटर निळया रॉकेलचा अवैध साठा जप्त केला.

हिंगोली शहराच्या जवळ असलेल्या गारमाळ परिसरातील चंदू प्यारेलाले यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रॉकेल साठा साठवून ठेवल्याची गोपनिय माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंग चंदेल यांनी छापा टाकण्याची योजना आखली. त्यानुसार सापळा रचून पोलीस व महसूल प्रशासनाच्या पथकाने चंदू प्यारवाले यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी घरातील १ हजार ४२२ लिटर अवैध रॉकेलसाठा जप्त केला. रेशन दुकानावर विक्री करायचा रॉकेल साठा अवैध रित्या मिळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी घरामध्ये कोणीच उपस्थित नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय प्रकाश कांबळे यांनी चंदू प्यारेवाले विरुद्ध फिर्याद दिली.