संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नका, काँग्रेस नेत्यांचा राहुल गांधींना सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाऊ नये असा सल्ला काँग्रेसच्या कोअर ग्रुपमधील वरिष्ठ सदस्यांनी दिला आहे. लंडन दौऱ्यात राहुल गांधींनी संघाची तुलना थेट ‘मुस्लिम ब्रदरहूड’शी केली होती. संघ नेमका काय आहे, तो नेमका काय काम करतो हे राहुल गांधी यांना कळावे यासाठी संघाने त्यांना निमंत्रण दिल्याचं सांगण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे नागपूर येथे संघ मुख्यालयात गेले होते. तेथे प्रणवदांनी भाषणही केले. त्यावेळी काँग्रेसने प्रणवदा यांनी संघ मुख्यालयात जाऊ नये असा पवित्रा घेतला होता.दिल्लीतील संघाचे प्रचारप्रमुख अरुण कुमार यांनी ‘मुस्लिम ब्रदरहूड’ची तुलना केल्याबद्दल राहुल गांधींवर टीका केली होती. ज्यांना अजून हिंदुस्थान समजला नाही त्यांना संघ समजू शकत नाही असे अरुण कुमार म्हणाले होते.

17 ते 19 सप्टेंबरदरम्यान, दिल्लीतील विज्ञान भवनात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत संघाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना बोलाविण्याचा विचार संघाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. संघाने थेट नावे अद्याप जाहीर केली नाहीत, मात्र राहुल गांधी आणि माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठविले जाण्याची शक्यता आहे.