सामना ऑनलाईन । मुंबई
कफ परेड येथील गणेशनगर परिसरात असलेल्या कांदळवनातील खारफुटीच्या झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. विकास कांगळे (30) असे या तरुणाचे नाव होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गणेशनगरातील खारफुटीच्या जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत विकासचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. कफ परेड पोलिसांनी लगेच विकासचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. विकासने आत्महत्या का केली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.





























































