राष्ट्रसंत जैनमुनी तरुण सागर महाराज यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
तरुण सागर,जैनमुनी

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जैन मुनी, राष्ट्रसंत तरुण सागर महाराज यांचे दीर्घ आजाराने शनिवारी पहाटे 3.15च्या सुमारास नवी दिल्लीत निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. तरुण सागर महाराज यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी तरुण सागर महाराज यांना कावीळ झाली होती. त्यांना नवी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांनी कृष्णानगर येथील राधापुरी मंदिरात चार्तुमासस्थळी जाण्याचा निर्णय घेतला होता. चातुर्मासस्थळी त्यांनी संथारा किंवा स्वीकृतीनंतर संलेखना  घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार अन्नपाण्याचा त्याग केला. शनिवारी पहाटे 3.15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तरुण सागर महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले. दुपारी दिल्लीपासून 25 कि.मी. दूर उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे तरुण सागरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेवेळी भरपावसातही मोठ्या संख्येने भाविक हजर होते.

 

‘कडवे प्रवचन’साठी प्रसिद्ध

  • तरुण सागर महाराज यांचा जन्म मध्य प्रदेशातील दामोह येथे 26 जून 1967 रोजी झाला. त्यांचे नाव पवनकुमार जैन होते.
  • वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी दिगंबर जैन मुनी दीक्षा घेतली.
  • केवळ जैनच नाही तर इतर समाजांमध्येही तरुण सागर महाराज प्रसिद्ध होते. त्यांच्या प्रवचनांना सर्वधर्मीयांची मोठी गर्दी होत असे.
  • राजकारण, समाजकारण, कौटुंबिक कलह, समाजातील कृप्रथांविषयी स्पष्ट शब्दांत ते भाष्य करीत असत. त्यांची ‘कडवे प्रवचन’ म्हणून पुस्तकेही लोकप्रिय आहेत.
  • 2010मध्ये मध्य प्रदेश विधानसभेत आणि 26 ऑगस्ट 2016 मध्ये हरयाणा विधानसभेत तरुण सागर महाराज यांचे प्रवचन झाले होते.
  • तरुण सागर महाराज यांना क्रांतिकारी संत, राष्ट्रसंत म्हणून उपाधी देण्यात आली होती.