मशीन नव्हे, सुजाण नागरिक घडविणारे शिक्षण हवे – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

बदलत्या विश्वाबरोबर बदलणाऱया शिक्षणाचे मोठे आव्हान आज शाळांसमोर आहे. आधी शाळा, नंतर डिग्री आणि त्या डिग्य्रांची भेंडोळी घेऊन रोजगारासाठी फिरणारे तरुण अशी आजची परिस्थिती आहे. तेव्हा भविष्यात संधीची इमारत बांधताना ‘शाळा’ हा पाया मजबूत असायला हवा. शाळांमधून मशीन नव्हे तर सुजाण नागरिक घडविणारे शिक्षण द्यायला हवे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडली.

परळ येथील आर. एम. भट शाळेच्या शताब्दी सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शाळेच्या शतक महोत्सवी वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे म्हणाले, शाळा या केवळ मशीन घडवत नाहीत, तर सुजाण नागरिक घडवत असतात. इथले विद्यार्थी जे कर्तृत्व गाजवतात त्यातून पुढे शाळा ओळखल्या जातात. असेच सुजाण नागरिक या आर. एम. भट शाळेने घडविले आहेत. त्याच कृतज्ञतेने हे विद्यार्थी आता शाळेच्या प्रगतीला हातभार लावत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव ए. एस. गोसावी, आमदार अजय चौधरी उपस्थित होते.

शाळा मनात घर करून राहते

जेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपण शाळा सुटायची वाट बघतो. पण जेव्हा दहावीनंतर खऱया अर्थाने शाळा सुटते तेव्हा तीच शाळा आपल्या मनात घर करून राहते, हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

मशीन नव्हे, सुजाण नागरिक घडविणारे शिक्षण हवे – उद्धव ठाकरे
आईने शिकवलेली अ, आ, ई आणि शाळेत गिरवलेले धडे आपण कधीच विसरू शकत नाही. आज फळ्यांचा काळा रंग बदलून तो हिरवा झाला आहे. ज्या काळ्या फळ्यावर आपण शिकलो तोच काळा रंग आपण अंधश्रद्धा म्हणून नाकारतो. याच काळ्या फळ्याने आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडला हे विसरतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पिढय़ान्पिढय़ा घडवणारे ज्ञानतीर्थ – संजय राऊत
महात्मा गांधींपासून ते बॅरिस्टर जीनांपर्यंत सारा देश ज्या गुरूंचा सल्ला घेण्यासाठी येत होता, त्या गोपाळ कृष्ण गोखले यांच्या नावाने एक शिक्षण संस्था सुरू होते. या संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱया आर. एम. भट शाळेला 100 वर्षे पूर्ण होतात ही फार मोठी बाब आहे. ही नुसती शाळा नव्हे तर पिढय़ान्पिढय़ा घडविणारे ज्ञानतीर्थ आहे, असे गौरवोद्गार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी काढले.

– दहा-बारा वर्षांत शाळेने दिलेल्या ज्ञानाचे ऋण फेडण्यासाठी गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाने उचललेले पाऊल हा जाणिवेचा संस्कार असल्याचे शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले.

माजी विद्यार्थ्यांच्या शाळेवरील प्रेमाचे कौतुक – कुलगुरू
आर. एम. भट शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या शाळेवरील प्रेमाचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी कौतुक केले. एखाद्या शाळेच्या 100 वर्षांच्या सोहळ्याला जाण्याची संधी टाळणे योग्य नाही तसेच माझा मोठा भाऊ याच शाळेत शिकला. त्यामुळे आज आवर्जून उपस्थित राहिल्याचे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.