बीडमध्ये राजकीय धक्कातंत्र, राजेंद्र मस्के भाजपच्या वाटेवर?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

पालकमंत्री पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आमदार विनायक मेटे यांच्यात नेहमीच शीतयुद्ध सुरू राहिले आहे. अशातच राजेंद्र मस्केसारखे मेटेंचे कट्टर समर्थक भाजपाच्या गळाला लागले आहेत. बीडमध्ये भाजपची ताकद वाढवून मेटेंना खिळखिळे करण्यासाठी भाजपने मस्केच्या रूपाने एक पाऊल उचलले आहे. भाजपच्या या प्रयत्नाला यश मिळाले असून राजेंद्र मस्के शिवसंग्रामला धक्का देऊन भाजपाच्या वाटेवर असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत.

राजकीय धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यात केव्हा आणि कोठे राजकीय स्फोट होईल हे सांगता येणार नाही. गेल्या दहा वर्षांपासून आमदार विनायक मेटे यांचे सर्वात जवळचे विश्वासू म्हणून गणले जाणारे जिल्हापरिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा शिवसंग्रामचे नेते राजेंद्र मस्के गेल्या काही दिवसांपासून शिवसंग्राम आणि आमदार विनायक मेटे यांच्या पासून दुरावले आहेत. त्यांच्यात आणि शिवसंग्राममधील दरी जशी वाढत गेली तसे मस्के आणि भाजपातील अंतर कमी होत गेले. मुंबईत भाजप आणि शिवसंग्रामची युती असली तरी बीडमध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे आणि आमदार विनायक मेटे यांच्यात सुसूत्रता कधीच जाणवली नाही. जाणवली ती कटुताच..!

मागील नियोजनाच्या बैठकीतून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने विनायक मेटे बैठकीतून निघून गेले होते. बीडमध्येही भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. अलीकडे राजेंद्र मस्के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही संपर्कात होते. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सोबत असणाऱ्या सुसंवादाचा फायदा उचलत राजेंद्र मस्के यांनी आपल्या जिल्हापरिषद गटात विकास कामे करण्यासाठी मोठा निधीही मिळवला. या कामाच्या शुभारंभासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे बालाघाटावरही जाणार आहेत. या सर्व घडामोडीत बीड जिल्ह्यात नवे राजकीय समीकरणे शिजवले जात आहेत.