
सामना सामना । वसई
लोकल ट्रेनच्या दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचा मोबाईल पळवणाऱ्या ‘फटका गँगची’ दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. फटका गँगमुळे अनेक अपघात होऊन काही प्रवाशांना जीवही गेला आहे. वसईत सक्रिय असलेल्या फटका गँगमधील एका चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात वसई लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. सनी राफुकीय असे या चोरट्याचे नाव आहे.
वसई-पनवेल लोकलमध्ये प्रवास करणारा भाईंदर येथील सदा चाळेकर हा तरुण आपल्या मित्रासोबत 25 ऑगस्ट रोजी वसई पनवेल रेल्वेने प्रवास करीत होता. वसई स्थानकातून लोकल काही अंतरावर गेली असताना चाळकर आणि त्याचा मित्र मोबाईलवर चित्रण करत होते. याच वेळी ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चोरट्याने सदाच्या हातावर जोरदार फटका मारला. अचानक हातावर फटका बसताच त्याच्या हातातील मोबाईल खाली पडला आणि चोरटा मोबाईल घेऊन फरार झाला.
कळवा स्थानकात फटका गँगचा बळी, आरोपी अटकेत
दरम्यान, हा सर्व घटनाक्रम सदाच्या मागे असलेल्या त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये चित्रीत झाला होता. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. वसई लोहमार्ग पोलिसांनी मोबाईलमधील चित्रीत झालेल्या चोरट्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. सनी राफुकीय असे या चोरट्याचे नाव असून हा वसई पूर्वेच्या वाग्री पाडा येथील रहिवासी आहे. फटका गँगचे चोरटे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला थांबून, लोकलच्या दरवाज्यात असलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांचे मोबाईल घेऊन फरार होतात. त्यामुळे वसई लोहमार्ग पोलीस या गँगमधील इतर चोरट्यांचा शोध घेत आहे.



























































