
सामना ऑनलाईन, मुंबई
कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या श्रीसिद्धिविनायक मंदिराचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. हे तिकीट सर्वांच्या घरी शुभवार्ता घेऊन जाईल, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाप्पाला साकडे घातले.
गणेशपर्वाच्या सुरुवातीलाच सिद्धिविनायक मंदिरात आज सकाळी हा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गाभाऱयासमोरच गणपतीच्या साक्षीने टपाल तिकिटाचे लोकार्पण केले. महाराष्ट्रावरील सर्व संकटे दूर करण्याची प्रार्थना आपण सिद्धिविनायकाच्या चरणी केल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी टपाल विभाग आणि मंदिर न्यासाचे अभिनंदनही केले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार, महाराष्ट्र सर्कलचे पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, खासदार राहुल शेवाळे, आमदार ऍड. अनिल परब, न्यासाचे कोषाध्यक्ष सुमंत घैसास यांच्यासह विशाखा राऊत, सुबोध आचार्य, संजय सावंत, वैभवी चव्हाण व अन्य विश्वस्त उपस्थित होते.
बाप्पासह तिकिटावर स्वतःचाही फोटो लावता येणार
टपाल विभागाच्या ‘माय स्टॅम्प’ योजनेंतर्गत हे तिकीट तयार करण्यात आले आहे. या तिकिटावर भाविकांना आपला तसेच आपल्या नातेवाईकांचा फोटो देऊन विशेष स्टॅम्प बनवता येणार आहे. तिकिटावरील अर्ध्या भागात सिद्धिविनायक मंदिराचा तर अर्ध्या भागात संबंधित भाविकाने दिलेला फोटो लावला जाईल. या विशेष सेवेसाठी मंदिराच्या आवारात कक्ष सुरू केला जाणार आहे.




























































