मलकापूरच्या ५ आरोपींना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केले हद्दपार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

मलकापूर येथील पाच आरोपींना ६ महिन्यांसाठी घाटाखालील पाच तालुक्यातून जिल्हा पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी हद्दपार करण्याचे आदेश काढले आहे. एखादी टोळी हद्दपार करण्याची बुलढाणा जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

मलकापूर शहरातील शहजाद खान सलीम खान (३०, मालवीय पुरा) हा टोळी प्रमुख असून त्याचे साथीदार मोहम्मद दानिश शेख रशीद (२६, सायकलपुरा), शेख शाहीद अहमद अ. सलाम (३०, मोहनपुरा), अतिकुर रहेमान शफिकुर रहेमान (३३, पांढरी, पारपेठ) व शेख आरिफ शेख अहमद (३५, फातेमा नगर) ही टोळी  गुन्हे करण्यात सराईत होती. त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल घडविणे, दंगलीत घातक हत्यारांचा वापर करणे, सरकारी नोकरास कामात अडथळा निर्माण करणे व त्याच्यावर हल्ला करणे, अत्यावश्यक वस्तुंची काळाबाजारी करणे, शासकीय व खाजगी मालमत्तेस नुकसान पोहोचविणे असे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे तर दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ वक्तव्य करणे यासारखे अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद पोलीस ठाणे मलकापूर शहर व दसरखेड एमआयडीसी येथे झालेली आहे. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी कायदेशीर व प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट त्यांच्या कृत्यामूळे परिसरात सर्व सामान्य जनतेत भिती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊन कोणीही त्यांच्याविरुद्ध खुलेपणाने तक्रार करण्यास धजावत नव्हते.

या टोळीला  किमान २ वर्षासाठी बुलढाणा, जळगाव व अकोला जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव मलकापूर शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षकांनी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना सादर केला होता. बुलढाणा पोलीस अधिक्षकांनी व्यापक विचार करुन मलकापूर शहरातील टोळीला ६ महिन्यांसाठी  मलकापूर, नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद व खामगाव या तालुक्यांमधून हद्दपार करण्याबाबत १४ सप्टेंबर रोजी आदेश पारित केला आहे.