
सामना प्रतिनिधी, पणजी
निळेशार समुद्र किनारे आणि किनाऱ्यावरील माडाच्या बागा हे गोव्यात सर्वत्र पाहायला मिळतात. ताळगावमधील ओडशेल भागात समुद्र किनारी माडांच्या बागेत राहणाऱ्या कुंकळ्येकर कुटुंबाने माडाच्या सर्व भागांचा वापर करून साकारलेली गणपतीची आरास सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
कुंकळ्येकर यांच्या घरात प्रवेश करताच दरवाजावर नारळाच्या हिरव्या झावळ्यांपासून बनवलेला कमान आपले स्वागत करते. घरच्या हॉलमध्ये प्रवेश करताच आपण नारळाच्या घरात गेल्याचा भास आपल्याला होतो. गणपती आला की लोक भिंती रंगवतात. कुंकळ्येकर यांनी मात्र आपल्या घराच्या भिंतीना नारळाच्या किशांचा साज चढवला आहे. इतर लोक गणपतीच्या खोलीत कागदी पताका लावतात मात्र कुंकळ्येकर यांनी नारळाच्या सुक्या सोडणांच्या पताका करून गणपतीची खोली सजवली आहे. खोलीतील मोकळ्या भिंतीवर माडाच्या विविध भागांचा वापर करून फुले साकारण्यात आली आहेत. इतकेच काय तर नारळाच्या झावळ्यांचे पडदे करून दरवाजा आणि खिडक्या सजवण्यात आल्या आहेत.
गणपतीची मागची आणि बाजूची भिंत नारळाच्या अर्ध्या करवंटया चिकटवून भरण्यात आली आहे. गणपती समोर माडाचे पिडे वापरून टीपॉय बनववून त्यावर पूजेसाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. लामण दिव्यांऐवजी माडाचे बुंधे वापरून तो आकर्षक स्टँड करून त्यावर समया ठेवण्यात आल्या आहेत. गणपतीच्या समोर सुक्या करवंट्या वापरून रांगोळी काढण्यात आली आहे. सर्वात विशेष म्हणजे थर्मोकोलच्या मखराऐवजी नारळाच्या किशा वापरून बनवलेल्या नारळात गणरायांची स्थापना करण्यात आली आहे. माटोळीमध्ये बिन सोललेले हिरवे नारळ वापरून सजावटीला वेगळा आयाम देण्यात आला आहे. आसपासचे लोक या नारळातील गणपतीचे दर्शन घेताना देखावा साकारलेल्या अनिकेतचे तोंड भरून कौतुक करत आहेत.
summary- ganpati decoration with coconut in goa





























































