
सामना ऑनलाईन । पेइचिंग
फिलीपाइन्स आणि हाँगकाँगला तडाखा देत माखूत वादळ आता चीनमध्ये धडकले आहे. चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगडॉन्ग प्रातांला याचा तडाखा बसला असून सुमारे 24 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. येथे 162 किलोमीटर प्रतितास या वेगाने वादळी वारे वाहत आहेत. फिलीपाइन्समध्ये या वादळाने 62 जण मृत्यूमुखी पडले आहेत.
वादळाचा तडाखा बसलेल्या भागातून 24 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तर 48 हजार नाविकांना समुद्रात न जाता किनारपट्टीवर तातडीने परतण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच 29 हजार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे काम थांबवण्यात आले आहे. सुरक्षिततसेाठी 632 पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे 400 पेक्षा जास्त विमानउड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. किनारपट्टीजवळील भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण चीनच्या ग्वांगडॉन्ग, हैनान आणि ग्वाक्सी जुआंग या भागांना वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. तेथे वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होत आहे.
सुरक्षितस्थळी हलवलेल्या नागरिकांसाठी 3 हजार 777 मदत शिबिरे स्थापन करण्यात आली असून त्यांना खाद्यपदार्थ आणि अत्यावश्यक वस्तू पुरवण्यात येत आहे. किनारपट्टीच्या भागात मदतीसाठी लष्कर आणि आपात्कालीन दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच एक हजार लाइफ बोट तयार ठेवण्यात आल्या आहेत.




























































