
सामना ऑनलाईन । नांदेड
शेळ्या चारण्यासाठी शेतात जाणाऱ्या तीन शाळकरी भावंडाचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना सोमवारी कंधार तालुक्यातील उम्रज येथे दुपारी चार वाजता घडली. या घटनेमुळे उम्रज गावावर शोककळा पसरलेली आहे. उम्रज गावाजवळील शेतीत गणपत गायकवाड हे सालगडी म्हणून काम करतात. तिघेही मृत भावंडे त्यांची नातवंडे आहेत. गायकवाड यांची चार मुले हैदराबादमध्ये मजुरीचे काम करतात. चार मुलांपैकी विष्णु यांची मुलगी रोशनी (११), रोहन (९) आणि देवानंद यांची मुलगी तनीषा (११) हे तिघे शेळ्या चारण्यासाठी शेताकडे गेले होते. शेताजवळ आल्यावर बंधाऱ्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटागंळ्या खाऊ लागले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र जवळपास कोणीच नव्हते. त्यामुळे बंधाऱ्यात बुडून तिघांचा मृ्त्यू झाला. या घटनेमुळे उम्रज गावावर शोककळा पसरली आहे.
































































