
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
दिल्लीत एका भावाने त्याच्या गंतीमंद बहिणीवर अत्याचार करत तिला दोन वर्ष घराच्या टेरेसवर डांबून ठेवल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेला तिचा भाऊ गेल्या चार दिवसातून एकदा एक ब्रेड खायला द्यायचा त्यामुळे ही महिला अत्यंत कुपोषित झाली आहे. दिल्ली महिला आयोगाने मंगळवारी या महिलेची सुटका केली आहे. या प्रकरणी महिलेच्या लहान भावाने मोठ्या भावाविरोधात तक्रार केल्यानंतर त्या महिलेची सुटका करण्यात आली. याप्रकरणी महिलेच्या मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ही गतिमंद असून ती तिच्या आई व भावासोबत रोहिनी भागात राहायची. दोन वर्षांपूर्वी महिलेच्या आईचे निधन झाल्यावर त्या महिलेची संपूर्ण जबाबदारी तिच्या भावावर पडली. त्यानंतर भावाने व त्याच्या बायकोने त्या महिलेला टेरेसवर डांबून ठेवण्यास सुरुवात केली. तो चार दिवसांनी एकदा तिला एक ब्रेड खायला द्यायचे. पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून तिला बांधून देखील ठेवण्यात आले होते. त्यामुळे ती महिला त्या जागीच सर्व नैसर्गिक विधी करायची. पीडित महिलेचा दुसरा भाऊ बाहेर गावी असायचा. त्याला बहिणीच्या परिस्थिती विषयी समजल्यानंतर तिची सुटका करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र मोठ्या भावाने तिला सोडण्यास नकार दिल्यामुळे लहान भावाने दिल्ली महिला आयोगाकडे याबाबत तक्रार केली. जेव्हा महिला आयोग त्या महिलेची सुटका करण्यासाठी आला तेव्हा महिलेच्या भावाने घराचे मुख्यद्वार खोलण्यास नकार दिला तसेच महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या. त्यामुळे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलवले. पोलिसांनी शेजारच्या घराच्या टेरेसवरून पीडित महिलेच्या टेरेसवर प्रवेश केला. त्यावेळी त्यांना महिलेची अवस्था बघून प्रचंड धक्का बसला. दोन वर्षापासून त्याच जागी नैसर्गिक विधी त्या महिलेने केलेल्या होत्या व त्यातच ती झोपलेली होती. त्यानंतर महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तिची सुटका केली व तिला रुग्णालयात दाखल केले.
‘आज एका महिलेची तिच्या भावाच्या तावडीतून सुटका केली. तिच्या भावाने तिला गेल्या दोन वर्षांपासून डांबून ठेवलेले होते. ती बिलकूल बोलू, चालू शकत नाही. ती कुणाला ओळखतही नाही. मला त्या महिलेची अवस्था बघून अत्यंत धक्का बसलाय. ती महिला फक्त ५० वर्षांची आहे मात्र गेल्या दोन वर्षात तिच्यावर जे अत्याचार झाले त्यामुळे ती ९० वर्षांची वाटू लागली आहे.’ असे दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांनी ट्विट केले आहे.
SUMMARY : Brother Held for keeping sister Captive For 2 Years


























































