
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अयोध्येच्या रामजन्मभूमीवर लवकरात लवकर राम मंदिर व्हायलाच हवे. कारण भगवान राम देशातील बहुसंख्य जनतेसाठी भगवान आहे. पण आमच्यामते तो केवळ भगवानच नाही तर ‘इमामे हिंद’ आहे. त्याचे मंदिर त्याच्या जन्मस्थळावरच व्हायला हवे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल देशवासीयांच्या मनात असणाऱया शंका-कुशंकांना थेट उत्तरे मिळावीत यासाठी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘भविष्य का भारत-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का दृष्टिकोन’ या कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी उपस्थितांच्या 25 विषयांवरील 215 प्रश्नांना खुल्या वातावरणात उत्तरे देताना सरसंघचालक मोहन भागवत बोलत होते. यावेळी राम मंदिराचा अध्यादेश काढणे सरकारच्या हातात तर मंदिर उभारणीचे संयोजन करणे राम जन्मभूमी संघर्ष समितीच्या हातात आहे. या दोन्ही पक्षात मी नाहीय. पण संघाची भूमिका म्हणून राम मंदिर अयोध्येतच व्हायला हवे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे, असेही भागवत यांनी स्पष्ट केले.
गोरक्षेला मॉब लिंचिंगशी जोडणे अयोग्यच
गोरक्षा करणाऱया सर्वांनाच मॉब लिंचिंगसारख्या गुन्हेगारी प्रकारांशी जोडणे योग्य ठरणार नाही असे सांगून सरसंघचालक भागवत म्हणाले, गोरक्षा झाली पाहिजे हे राज्यघटनेचेच मत आहे. देशातील बहुसंख्य जनतेच्या अर्थार्जनासाठी गाय हा उपयुक्त आणि धर्मासाठी पवित्र पशू आहे. तिची हत्या रोखायलाच हवी, पण समोरच्याचे रक्त सांडून नाही. गोरक्षकांविरुद्ध सर्व आवाज उठवतात, पण गोतस्करांविरोधात कुणी बोलत नाही हा दुटप्पीपणाच असल्याचे प्रतिपादन भागवत यांनी केले.

























































