अफवांचा बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमित घोडेकर,[email protected]

एखादी बातमी किंवा चित्रीकरण व्हायरल होते… कुठे आहे याचे उगमस्थान….?

गेल्या काही दिवसांपासून अनेक समाजमाध्यमांवर खूप मोठय़ा प्रमाणात खोटय़ा बातम्या आणि अफवांचा बाजार पसरला आहे. या बातम्या कोणत्याही प्रकारच्या असतात. अगदी एखाद्या छोटय़ा गावात लहान मुले चोरणारी टोळी आली आहे आणि ते लहान मुलांचे अपहरण करतात किंवा एखाद्या शहरातील पूल तुटला आहे आणि त्याच्यावरून अपघात झाला आहे आणि अनेक जण दगावले आहेत अशी खोटी बातमी असो किंवा पावसाळ्यात एखाद्या दिवशी खूप पाऊस पडणार असून कोणीही घरातून बाहेर पडू नका अशा खबरदारीच्या बातम्या असोत की कोणी एखादा कलाकार किंवा मोठय़ा व्यक्तीचे निधन झाले असल्या विकृत प्रकारच्या बातम्या असोत, अशा गेल्या काही दिवसांत अक्षरशः हजारो  खोटय़ा बातम्या प्रसारित होत आहेत आणि या बातम्या कमी व्हायचं नावच घेत नाही.

असल्या बातम्यांमुळे अनेक अघटित गोष्टी घडत आहेत आणि त्यात खूप मोठय़ा प्रमाणात समाजाचे नुकसान होत आहे. लहान मुले चोरणारी टोळी आपल्या गावात आली आहे. या खोटय़ा बातमीमुळे आता आपली मुले चोरली जातील या भीतीने जमावाकडून अनेक लोकांवर हल्ला करून ते खरंच चोर आहेत की नाही याची शहानिशा न करता त्यांचा जीव घेतला गेला. अशा प्रकारची बातमी देशात अनेक ठिकाणी पसरली आणि दोनतीन ठिकाणी निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला. या बातमीमध्ये ज्या टोळीचा फोटो वापरला होता. ती टोळी पाकिस्तानमध्ये होती आणि तो फोटोदेखील तिथल्याच कुठल्याशा शहराचा होता, याच बातमीचा वापर करून लोकांच्या मनात भीती पसरवली गेली आणि त्याचे पर्यवसान अनेकांचा जीव घेऊन गेला.

मोठय़ा कलाकाराचे किंवा मान्यवर व्यक्तीचे निधन झाले आहे अशा प्रकारच्या बातम्या तर नित्याच्या झाल्या आहेत असल्या बातम्यांमुळे त्या मान्यवर व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना किती मानसिक त्रास होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. या बातम्यादेखील ‘गणपती दूध पितो’ ही बातमी ज्या वेगाने प्रसारित झाली, त्याच्या हजारो पटीने प्रसारित होते. असंच काहीसं अमुक एका रेल्वे किंवा विमानाचा अपघात होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत असल्या अपघाताच्या बातम्यांमुळेदेखील होतं. यातदेखील त्या ठिकाणावरून प्रवास करणाऱया लोकांची कुटुंबं कोणत्या मानसिक तणावातून जात असतील ते देवच जाणे.

सोशल नेटवर्किंग आणि त्यातल्या त्यात व्हॉटस् ऍप आणि फेसबुक हे असल्या फेक बातम्या पसरवण्याचे मुख्य स्रोत झाले आहेत. व्हॉटस् ऍपमध्ये असणारे वेगवेगळे ग्रुप हे सध्या अतिशय जलद गतीने माहिती प्रसारित व्हायचे सगळ्यात मोठे स्रोत आहेत. कोणत्याही एका व्यक्तीला मेसेज पाठवण्यापेक्षा एका ग्रुपमध्ये मेसेज टाकला की, तो एकाच वेळेस अनेक लोक वाचू शकतात आणि पुढे तेच लोक मग तोच मेसेज दुसऱया ग्रुपमध्ये पोस्ट करून त्या मेसेजला काही क्षणांत हजारो किंवा लाखो लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळेच अनेकदा अफवा किंवा चुकीची माहिती व्हॉटस् ऍप ग्रुपमधून सुरू होते.

फेक बातम्या हा सध्या खूप मोठा विषय झाला आहे. त्याला राजकारणाचेदेखील रंग चढू लागले आहेत. कोणत्याही व्यक्तीला बदनाम करण्याचे सर्वोत्तम आयुध म्हणून असल्या अफवा आणि फेक बातम्यांचा राजकारणासाठीदेखील वापर केला जात आहे. त्यामुळे फेक बातम्या या वरवर वाटणाऱया काही क्षुद्र गोष्टी नसून यात नक्कीच काहीतरी काळंबेरं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही आपल्याला सोशल नेटवर्किंग  वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. आपण  थोडीशी काळजी घेतली तर अशा बातम्यापासून वाचू शकतो. त्याची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल. कोणतीही माहिती जर संशयास्पद किंवा अनुचित वाटत असेल तर दुसऱया कोणालाही पाठवू नका आणि ती माहिती आपल्या ज्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांनी पाठवली असेल त्यांना अशी माहिती प्रसारित न करण्याचे आव्हान करा.