मोहर्रमसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा अपघातात मृत्यू, 6 गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

मोहर्रमनिमित्त हैदराबाद येथून आलेल्या पाहुण्यांना घेऊन धापेवाडाच्या चांदशहा दर्ग्यात दर्शनासाठी जाणाऱ्या नागपुरातील रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कळमेश्वर – सावनेर मार्गावर अपघात झाला आहे. ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर झाला.

नागपुरातील ताजबाग येथील खान कुटुंबिय त्यांच्या हैदराबादहून आलेल्या पाहुण्यांना घेऊन तीन रिक्षांमधून धापेवाडा येथील चांदशहा दर्ग्यात दर्शनासाठी निघाले होते. कळमेश्वर -सावनेर मार्गावरील वरोडा शिवारातील सावनेरहून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने तीन पैकी एका रिक्षाला धडक दिली़. अपघात येवढा भीषण होता की, रिक्षाचा चुराडा होऊन 5 जणांचा जागीच मृत्यु झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये फतिमा खान(40), आसमा खान(23), नाजीर खान(दीड वर्ष), माहीम खान (अडीच वर्ष), फज्जू शेख (5) यांचा समावेश आहे. तर नसरिन शेख (30), पिंकी शेख (29), हसन शेख व हुसेन शेख हे जुळे भाऊ (30), युनूस शेख(7), सईदा शहादुल्ला (75) हे गंभीर जखमी झाले़ आहेत.

दरम्यान, अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार झाल्याने घटनास्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती कळमेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील धोपटे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले़. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला व सावनेर पोलीस उपविभागीय अधिकारी चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली़. तर अपघातानंतर ट्रक सोडून फरार झालेल्या ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.