
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवाजी पार्क, दादर परिसरात असलेल्या बंद दुकानात घुसून चोरांनी हात साफ केल्याची घटना आज पुन्हा घडली. दोन दिवसांत सहा दुकानांना चोरांनी लक्ष्य केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे. शिवाजी पार्क परिसरातील तीन आणि दादर परिसरातील तीन दुकाने फोडण्यात आली आहेत.
बुधवारी दादर येथील दुकानांमध्ये चोरी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा तीन दुकानांना लक्ष्य करण्यात आले. चोरटे पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत बंद दुकानात घुसून ड्रॉवरमधील रोकड चोरून नेत आहेत. याप्रकरणी लालबहाद्दूर कोरी यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रत्येक दुकानातील रोकड चोरण्यात आली असून काही दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरांची हातसफाई कैद झाली आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी अशी मागणी दादर व्यापारी संघाचे अध्यक्ष सुनील शहा यांनी केली आहे.
summary- shops in dadar has been looted
























































