डोंबिवली स्थानकातील नव्या एफओबीचे काम ‘लटकणार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । डोंबिवली

पावसाळ्यानंतर डोंबिवली स्थानकातील 40 वर्षे जुना पूल तोडून दोन महिन्यांत नवा एफओबी उभारण्याची शिफारस रेल्वेच्या समितीने केली होती. मात्र आतापर्यंत फक्त डिझाईन तयार केले असून त्याची मंजुरी मिळण्यासाठीदेखील वेळ लागणार आहे. रेल्वे प्रशासनाचा आस्ते कदम कारभार आणि जुना पूल तोडण्यासाठी घ्यावा लागणारा ब्लॉक आदी विविध अडचणींमुळे नव्या एफओबीचे काम ‘लटकणार’ आहे. डोंबिवलीकरांची मात्र गर्दीतून सुटका होण्याची चिन्हं अजून दिसत नसून दिवसेंदिवस स्थानकातील गर्दी वाढत चालल्याने प्रवासीच ‘ब्लॉक’ झाले आहेत.

एलफिन्स्टन पुलाची दुर्घटना घडल्यानंतर मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे स्थानकांतील पुलांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने तज्ञांची समिती नेमली होती. या समितीने डोंबिवली स्थानकाचा दौरा केला तेव्हा कल्याणच्या दिशेकडे असलेला अरुंद पूल हा धोकादायक झाला असल्याचे आढळून आले. हा पूल केवळ साडेचार मीटर रुंद आहे. गर्दीच्या वेळी सकाळी व संध्याकाळी या पुलावर प्रवाशांची अक्षरशः घुसमट होते. त्यामुळे हा पूल तोडून नवा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी शिफारसदेखील समितीने प्रशासनाला केली होती.

सध्याचा अरुंद पूल तोडून तो 9 मीटर रुंद व 500 मीटर लांब करण्यात येणार आहे. समितीने शिफारस करून बराच कालावधी लोटला तरी एफओबी बांधण्यासाठी फारशी हालचाल दिसून येत नाही. आतापर्यंत डिझाईन बनवले गेले असून मंजुरीसाठी प्रशासनाला पाठवले आहे. या डिझाईनची मंजुरी, सेफ्टी विभाग, मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त, जुना पूल पाडण्यासाठी घ्यावा लागणारा ब्लॉक आदी अनेक कामे बाकी आहेत. त्यानंतर एफओबीच्या कामाला सुरुवात होणार असली तरी जुना पूल पाडण्याबाबतचे वेळापत्रक आखलेले नाही.  त्यामुळे नवा एफओबी लटकण्याचीच चिन्हे आहेत.

चेंगराचेंगरी व तुटलेल्या पायऱ्या

रेल्वे प्रशासनाच्या लेट लतीफ कारभारामुळे अजूनही लाखो डोंबिवलीकरांना रोज सकाळ-संध्याकाळ याच अरुंद पुलावरून जावे लागते. या पुलाच्या पायऱयाही तुटल्या असून अनेक प्रवासी पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पुलावर रोजच चेंगराचेंगरी होत असून आरपीएफने गर्दी लक्षात घेऊन पुलाचा वापर करू नका, असे फलक लावले होते. मात्र संतप्त प्रवाशांनी पुलाची रुंदी वाढवा, अशी मागणी केली तसेच आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तो फलक काढण्यात आला.