
सामना प्रतिनिधी । मुंबई
रविवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. शहरातून निघणाऱया प्रत्येक मिरवणूक तसेच चौपाटय़ांवरील हालचालींवर 50 हजार पोलिसांसह सीसीटीव्ही व ड्रोनमधून बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महिला व बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येणार असून त्यासाठी मुंबई पोलिसांना विशेष ऍक्शन प्लॅन तयार झाला आहे.
शहरात एकूण 162 विसर्जन ठिकाणे आहेत. या ठिकाणी शहरातील कानाकोपऱयातून गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी आणल्या जातात. यावेळी मिरवणूक काढली जाते. त्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी शहरात ठिकठिकाणी होत असते. या गर्दीचा समाजकंटक, गुन्हेगार तसेच दहशतवाद्यांकडून गैरफायदा घेतला जाऊ नये याची मुंबई पोलिसांनी सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे. चौपाटय़ा व मिरवणुका जाणार त्या मार्गांवर गणवेशधारी पोलिसांबरोबरच साध्या वेशातील पोलीसदेखील तैनात राहणार आहेत. विशेष करून छेडछाडविरोधी पथक तसेच चोऱया होऊ नये यासाठी खास पथकांकडून वॉच ठेवण्यात येणार आहे.
असा असेल बंदोबस्त
50 हजार पोलिसांचा ताफा, क्यूआरटी, एसआरपीएफ, आरएएफ, फोर्स वनच्या तुकडय़ा, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स, स्काऊट-गाईडचे विद्यार्थी, बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात असणार आहे.
…तर लगेच 100 नंबर डायल करा
शहरात कुठेही काही संशयास्पद वस्तू अथवा इसम दिसल्यास त्वरित तेथे तैनात असलेल्या पोलिसांना सांगा. नाहीतर 100 नंबर डायल करून पोलिसांना त्याबाबत माहिती द्या. याशिवाय मुंबई पोलिसांना ट्विट करूनही माहिती देऊ शकता. काहीही झाले तरी पोलिसांना कळवा, अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच गर्दीच्या ठिकाणी लहान मुले आणि मौल्यवान साहित्य घेऊन जायचे टाळा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
103 मंडळांवर गुन्हे
गणेशोत्सवादरम्यान डीजे-डॉल्बी लावण्यावर बंदी होती. मात्र तरीदेखील ध्वनिप्रदूषण करणाऱया शहरातील तब्बल 103 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल केले असल्याचे मुंबई पोलीस पीआरओ उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.
‘लालबागचा राजा’च्या विसर्जनासाठी विशेष बंदोबस्त
‘लालबागचा राजा’ची विसर्जन मिरवणूक खूप वेळ चालते. शिवाय या मिरवणुकीत भाविकांची प्रचंड गर्दीदेखील उसळते. त्यामुळे या ‘लालबागचा राजा’च्या मिरवणुकीसाठी 550 पोलीस कर्मचारी आणि 80 अधिकाऱयांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, 18 सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस ‘लालबागचा राजा’च्या दरबारात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी करीत पोलिसांशी हुज्जत घातली होती. यावेळी उपायुक्त अभिनाश कुमार व अन्य पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेची चौकशी करण्यात येईल, त्यावेळचे सीसीटीव्ही तपासले जातील. त्यानंतर जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे उपायुक्त शिंगे यांनी सांगितले.

























































